प्रज्ञाननंदाने कार्लसनला नमविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 10:41 AM2024-05-13T10:41:50+5:302024-05-13T10:42:01+5:30
पण तो सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत अद्याप तिसऱ्याच क्रमांकावर आहे.
वॉरसों : भारताच्या आर. प्रज्ञाननंदाने जगातील अव्वल खेळाडू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याच्यावर आणखी एक विजय मिळवला. पण तो सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत अद्याप तिसऱ्याच क्रमांकावर आहे.
चीनच्या वेई यी याने २.५ गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे. ब्लिट्ज स्पर्धेत अद्याप नऊ फेऱ्या शिल्लक आहेत. वेई यी सात विजयांसह २०.५ गुणांसह आघाडीवर कायम आहे. कार्लसनचे १८ गुण आहेत आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रज्ञाननंदाचा क्रमांक आहे. या भारतीय खेळाडूचे १४.५ गुण आहेत.
मुख्य विजेतेपदासाठी वेई यी आणि कार्लसन यांच्यातच सामना होणार आहे. भारताचा अर्जुन एरीगॅसी १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पोलंडचा डुडा जान क्रिज्सटोफ १३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसात्तोरोव १२.५ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने जर्मनीच्या विंसेंट किमर याच्यावर एका गुणाची आघाडी घेतली आहे.
स्पर्धेत सुरुवातीला आघाडीवर राहिलेला रुमानियाचा किरिल शेवचेंको ११ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. हॉलंडचा अनीश गिरी १०.५ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा आव्हानवीर डी. गुकेशचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कारण तो या स्पर्धेत ९.५ गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे.