Praggnanandhaa OUT : भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदचे Airthings Masters स्पर्धेतील आव्हान संपुष्टात; दोन दिवसांपूर्वी 'वर्ल्ड चॅम्पियन'ला केलं होतं पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:21 IST2022-02-23T14:20:36+5:302022-02-23T14:21:51+5:30
शेवटच्या फेरीत रशियाच्या खेळाडूने प्रग्यानंदला चारली धूळ

Praggnanandhaa OUT : भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदचे Airthings Masters स्पर्धेतील आव्हान संपुष्टात; दोन दिवसांपूर्वी 'वर्ल्ड चॅम्पियन'ला केलं होतं पराभूत
Praggnanandhaa OUT : भारताचा युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद याचे सध्या सुरू असलेल्या Airthings Championship या जलद बुद्धिबळ ऑनलाईन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दोन दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियन व जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिल्याने प्रग्यानंदचे खूप कौतुक झाले होते. पण पहिल्या फेरीच्या १५व्या चरणात त्याला रशियाच्या व्लादीस्लाव अर्तमीव याने पराभूत केले. या पराभवामुळे प्रग्यानंदला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारता आली नाही.
वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला दिला होता पराभवाचा धक्का
१६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद याने सोमवारी 'वर्ल्ड चॅम्पियन' मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता. प्रग्नानंदने केवळ ३९ चालींमध्ये कार्लसनला गुडघे टेकायला लावले होते. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने काळ्या मोहऱ्यांसह हा खेळ जिंकला होता. या विजयानंतर चहुबाजूंनी त्याचे तोंडभरून कौतुक झाले. 'अनुभवी व प्रतिभावान मॅग्नस कार्लसनला पराभूत करणं... आणि त्यातही काळ्या मोहऱ्यांसह खेळताना वर्ल्ड चॅम्पियनला धूळ चारलं हे खरंच जादुई आहे. प्रग्यानंद, तू भारताचा अभिमान आहेस, असं ट्वीट करत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आर प्रग्यानंदचे कौतुक केलं होतं.
कार्लसनला पराभूत करण्याआधीच्या फेऱ्यांमध्ये प्रग्यानंदने फक्त लेव्ह अरोनियन विरुद्ध विजय नोंदवला होता आणि अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्धचे सामने अनिर्णित राखले होते. तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याविरोधात त्याला पराभव पत्करावा लागला होता.