आॅस्ट्रेलियन मीडियाकडून क्लार्कवर स्तुतिसुमने
By Admin | Published: March 28, 2015 01:53 AM2015-03-28T01:53:36+5:302015-03-28T01:53:36+5:30
उपांत्य फेरीत भारतावर मिळविलेल्या विजयानंतर आॅस्ट्रेलियन मीडियाने आॅस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कवर अभिनंदनाचा वर्षाव केला,
सिडनी : उपांत्य फेरीत भारतावर मिळविलेल्या विजयानंतर आॅस्ट्रेलियन मीडियाने आॅस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कवर अभिनंदनाचा वर्षाव केला, तर दुसरीकडे भारतीय
संघाने गमावलेल्या चांगल्या संधीवर टीकासुद्धा केली. आॅस्ट्रेलियाच्या ३२९ धावांच्या
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ ४६.५ षटकांत २३३ धावांवर गारद झाला. यावर आॅस्ट्रेलियन मीडियाने भारताने गमावलेल्या संधीवर तोंडसुख घेतले.
‘डेली टेलिग्राफ’नेआपल्या वृत्तात म्हटले, की भारताला जर आॅस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची स्थिती निर्माण करायची होती, तर कोहली किंवा धोनीने तसे प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, दोघेही तसे करू शकले नाहीत. कोहलीने निराशा केली आणि धोनीचे प्रयत्न तोकडे पडले. एका दैनिकाने लिहिले, की महेंद्रसिंह धोनी जोपर्यंत मैदानात होता, तोपर्यंत भारताची आशा कायम होती. मात्र, विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताच्या या कर्णधाराने गुडघे टेकले. धोनीने या सामन्यात सर्वाधिक ६५ धावा केल्या. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. तो धावबाद झाला. मॅक्सवेलचा हा ‘थ्रो’ शानदार होता. असे असले तरी धोनीने अर्ध्या खेळपट्टीवरच आशा सोडून दिल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने पिचवर पोहोचण्यासाठी अंतिम प्रयत्नही केले नाहीत. यावर इंग्लंडच्या पीटरसननेही म्हटले, की धोनीने पिचवर पोहोचण्यासाठी बॅटचा वापरही केला नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
एका दैनिकाने धोनीच्या खेळी विचित्र असल्याचे नमूद केले. ६५ धावांच्या खेळीत धोनी चाचपडत असल्याचे दिसून आले. तो धावांचा पाठलाग करीत असताना अंतिम क्षणाची प्रतीक्षा करीत होता. शेन वॉटसनच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने सुरुवात केली होती. मात्र, त्या वेळी खूप वेळ झाली होती.