पाकच्या दिग्गजांनी केली विराटची प्रशंसा
By admin | Published: February 29, 2016 02:42 AM2016-02-29T02:42:10+5:302016-02-29T02:42:10+5:30
पाकिस्तानचे माजी दिग्गज हनिफ मोहम्मद, जावेद मियांदाद व मोहम्मद युसूफ यांनी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत संयमी खेळी करणाऱ्या विराट कोहलीची प्रशंसा केली.
कराची : पाकिस्तानचे माजी दिग्गज हनिफ मोहम्मद, जावेद मियांदाद व मोहम्मद युसूफ यांनी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत संयमी खेळी करणाऱ्या विराट कोहलीची प्रशंसा केली.
पाकिस्तानी फलंदाजांना तंत्रामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी फलंदाजी करायची, याचे प्रशिक्षण कुठलाच प्रशिक्षक देऊ शकत नाही. भारतीय फलंदाजांनी आपल्या खेळावर कसून मेहनत घेतली आहे. त्यांच्यामध्ये धावा काढण्याची भूक दिसून येते. कोहली त्याचे उत्तम उदाहरण आहे.
- जावेद मियांदाद
पॉवर हिटिंगबाबत चर्चा योग्य आहे; पण परिस्थितीनुसार फलंदाजी शिकणे आवश्यक आहे. भारतात सुनील गावसकरपासून कोहलीपर्यंत अनेक शानदार फलंदाज घडले आहेत. अनेक दिग्गज फलंदाज असल्यामुळे भारतीय युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. भारतातील युवा खेळाडूंना सचिन तेंडुलकरकडून बरीच प्रेरणा मिळाली.
- हनिफ मोहम्मद
कठीण प्रसंगी कशी फलंदाजी करायची हे विराटने सिद्ध केले आहे. आमचे फलंदाज पाटा खेळपट्टीवर खोऱ्याने धावा वसूल करतात; पण चेंडू स्विंग होत असताना ते ढेपाळतात. गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रत्येक देशाचे फलंदाज संघर्ष करतात; पण ज्याचे तंत्र उत्तम आहे ते फलंदाज यावर छाप सोडण्यात यशस्वी ठरतात.’ मी नेहमीच म्हणतो की, पाकिस्तानचे फलंदाज गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर खेळताना कमकुवत भासतात. शनिवारी याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
अशा खेळपट्टीवर कसे खेळावे लागते, हे विराट कोहलीने दाखवून दिले. आमचे फलंदाज केवळ फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळू शकतात.’ युसूफ यांनी निराशाजनक कामगिरीसाठी कोचिंग स्टाफला दोष देण्यास नकार दिला. एक अन्य कर्णधार राशिद लतिफने संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली तर कसोटी संघाचा कर्णधार मिसबाह उल-हकने पाकला आपल्या रणनीतीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. - मोहम्मद युसूफ
विराट कोहलीला दंड
दुबई : आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर सामना शुल्काच्या ३० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. ही घटना भारतीय डावाच्या १५ व्या षटकात घडली. त्या वेळी कोहलीला पायचीत देण्यात आले. त्याने आपली बॅट दाखवत नाराजी व्यक्त केली आणि मैदानातून परतताना पंचाकडे वळून बघत काहीतरी पुटपुटला. ही खिलाडूवृत्तीला साजेशी कृती नव्हती. कोहली आयसीसी आचारसंहिता नियम २.१.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. कोहलीने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकारी जेफ क्रो यांनी
शिक्षा सुनावल्यानंतर ती मान्य केली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.