प्रणव-सिक्की मुख्य फेरीत

By admin | Published: April 13, 2016 03:05 AM2016-04-13T03:05:12+5:302016-04-13T03:05:12+5:30

प्रणव जैरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने चमकदार खेळ करताना सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या मिश्र दुहेरी गटातून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला, तर पुरुष गटात मात्र भारताच्या

Pranav-Sikki in main round | प्रणव-सिक्की मुख्य फेरीत

प्रणव-सिक्की मुख्य फेरीत

Next

सिंगापूर : प्रणव जैरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने चमकदार खेळ करताना सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या मिश्र दुहेरी गटातून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला, तर पुरुष गटात मात्र भारताच्या बी. साई प्रणीतला पात्रता फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे भारताच्या मुख्य आशा जिच्यावर होत्या त्या सायना नेहवालने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताच्या पदकाच्या सर्व आशा आता पी. व्ही. सिंधूवर आहेत.
पात्रता फेरीत विजयी सुरुवात करताना प्रणीतने इंडोनेशियाच्या विबोवो खो हेनरिखोविरुद्ध २१-११, २१-१० अशी बाजी मारली. परंतु, यानंतर इंडोनेशियाच्याच सोनी ड्वी कुनकोरोविरुद्ध प्रणीतचे आव्हान १८-२१, १२-२१ असे संपुष्टात आले, तर मिश्र दुहेरीमध्ये मात्र भारताची सकारात्मक सुरुवात झाली. सलामीच्या लढतीत प्रणव - सिक्की जोडीने यजमान सिंगापूरच्या गुआंग लियांग जेसन वोंग - यी लिंग एलेन चुआ या जोडीचा २१-१५, २१-११ असा पराभव केला.
यानंतर दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीने बिमो आदी प्रकासो आणि सित्रादेवी या स्थानिक जोडीचा २१-१३, २१-१० असा धुव्वा उडवून स्पर्धेची मुख्य फेरी गाठली. मुख्य स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारतीय जोडीपुढे इंडोनेशियाच्या इरफान फदहिलाह - वैनी अंग्रेनी यांचे कडवे आव्हान असेल. त्याचप्रमाणे एकेरीतील अन्य एका सामन्यात भारताच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तलाही अटीतटीच्या लढतीत मलेशियाच्या जुलफदली जुल्फिकलविरुद्ध १४-२१, २१-१६, १७-२१ असा निसटता पराभव पत्करावा लागला. यामुळे गुरुसाईदत्तही पात्रता फेरीतूनच स्पर्धेबाहेर गेला. (वृत्तसंस्था)

मुख्य स्पर्धा सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच भारताला मोठा धक्का बसला. ऐनवेळी सायनाने स्पर्धेतून माघार घेतली असताना, आता पदकासाठी भारताच्या सर्व आशा पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. त्याचवेळी पुरुष गटात के. श्रीकांत, एचएस प्रणय आणि अजय जयराम निर्णायक मानांकन गुण मिळवण्याचा प्रयत्न करून रिओ आॅलिम्पिकच्या तिकिटासाठी प्रयत्न करतील.
नुकताच झालेल्या मलेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेल्या सायनाने विश्रांतीसाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आगामी २६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेद्वारे सायनाच्या पुनरागमानाची शक्यता आहे. याबाबत सायनाचे वडील हरवीर सिंग नेहवाल यांनी माहिती देताना सांगितले, ‘‘सायना सध्या आपल्या सरावाला अधिक वेळ देऊ इच्छिते. मागील स्पर्धेनंतर तिने विश्रांतीसाठी माघार घेतली असून ती सरावावर सर्वाधिक वेळ देणार आहे. सायना पूर्ण तंदुरुस्त असून चांगल्या प्रकारे खेळत आहे.’’
सायनाच्या अनुपस्थितीत महिला गटात भारताचे नेतृत्व सिंधूकडे असून पुरुष गटात के. श्रीकांत भारतीय संघाची धुरा सांभाळेल.

Web Title: Pranav-Sikki in main round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.