एशियन स्पर्धेसाठी प्रणवची निवड, महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 04:18 IST2018-10-01T04:17:34+5:302018-10-01T04:18:35+5:30
देशाचे प्रतिनिधित्व करणार

एशियन स्पर्धेसाठी प्रणवची निवड, महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू
ठाणे : इंडोनेशिया येथे ८ ते १६ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘तिसऱ्या एशियन पॅरा गेम्स’ या स्पर्धेसाठी ठाण्यातील सतरावर्षीय प्रणव प्रशांत देसाई याची निवड झाली आहे. तो या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार असून त्याचबरोबर तो या अॅथलेटिक स्पर्धेत निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव अॅथलेटिकपटू असल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. येत्या ३ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेसाठी तो रवाना होत असून खुल्या गटातील १०० आणि २०० मीटर या दोन्ही स्पर्धांत तो धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत साधारणत: चाळीसहून देशांतील चार हजारांहून अधिक विविध स्पर्धा प्रकारांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्यासाठी असलेल्या टॉप आठमध्ये तो पात्र ठरला. त्यामुळे त्याची इंडोनेशिया येथे होणाºया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड झालेला ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील तो पहिला अॅथलेटिकपटू आहे. तो या स्पर्धेत त्याच्यापेक्षा वयाने किमान चार ते पाच वर्षे मोठ्या असलेल्या खेळाडूंशी दोन हात करणार आहे. २०१७ साली झालेल्या दुबई येथील राष्ट्रीय स्पर्धेतही प्रणव याने रौप्यपदकाची कमाई केली होती. साधारणत: दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव मैदानावर अॅथलेटिक्सचा सराव सुरू केला होता. त्याच्या मेहनतीमुळे त्याला हे शिखर गाठता आल्याचे पाटकर सांगतात.
दररोज पाच तास सराव
मुंबईतील वझे महाविद्यालयात इयत्ता बारावीचा विद्यार्थी असलेला प्रवण हा इंडोनेशिया स्पर्धेसाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी असा दिवसाला जवळपास पाच तास सराव करतो. गेले तीन आठवडे त्याने गांधीनगर येथे या स्पर्धेची संघासोबत कसून तयारी केली आहे. ३ आॅक्टोबर रोजी तो इंडोनेशिया येथे रवाना होईल.