प्रणीत, जयराम उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2015 12:52 AM2015-06-27T00:52:38+5:302015-06-27T00:52:38+5:30
भारताचा बी. साई प्रणीत आणि अजय जयरामने पुरुष एकेरीत अनुक्रमे श्रीलंकेचा निलुका करुणारत्ने आणि इंडोनेशियाचा विष्णू युलीचा पराभव
कालगेरी (कॅनडा) : भारताचा बी. साई प्रणीत आणि अजय जयरामने पुरुष एकेरीत अनुक्रमे श्रीलंकेचा निलुका करुणारत्ने आणि इंडोनेशियाचा विष्णू युलीचा पराभव करून कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिला दुहेरीत भारताची ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे व एन. सिक्की रेड्डी या जोड्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीमधील आपली जागा निश्चित केली.
या स्पर्धेत १०वे मानांकन असलेल्या प्रणीतने निलुका करुणारत्नेला ५७ मिनिटांत १४-२१, २१-१५, २१-१५ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ३३ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतची पुढच्या फेरीतील लढत आॅलिंपिक कास्यपदकविजेता व जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू ली जोंग वेईविरुद्ध होणार आहे. नवव्या मानांकन जयरामने इंडोनेशियाच्या विष्णूला २१-१२, १७-२१, २१-१२ असे नमविले.
महिलांच्या दुहेरीत भारताची अव्वल जोडी ज्वाला आणि अश्विनी यांनी नेदरलॅँडच्या समंथा बार्निंग व इरिस टेबलिंग जोडीला १६-२१, २१-१६, २१-१७ असे पराभूत केले. ज्वाला-अश्विनी जोडीचा पुढील सामना २०११ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक जिंकलेल्या हॉँगकॉँगच्या चान काका सज का व युपन सिन यिंग या जोडीबरोबर होईल. दुसऱ्या महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे व एन. सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या योहान गोलिसजेवस्की व कार्ला नेल्टे जोडीला सरळ दोन सेटमध्ये २१-१५, २१-१२ असे पराभूत केले. भारताचा आनंद पवारला पुरुष एकेरीत चीनच्या शुए सोंगने १५-२१, १३-२१ व महिला एकेरीत तन्वी लाडला कॅनडाच्या मिशेल लीकडून १४-२१, १३-२१ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)