प्रणीत, प्रणय यांची आगेकूच
By admin | Published: July 1, 2016 05:02 AM2016-07-01T05:02:38+5:302016-07-01T05:02:38+5:30
भारताचा अजय जयराम, दुसरा मानांकित एच. एस. प्रणोय आणि चौथा मानांकित बी. साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
कॅलगेरी : भारताचा अजय जयराम, दुसरा मानांकित एच. एस. प्रणोय आणि चौथा मानांकित बी. साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या अजय जयरामने दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या मार्टिन गियूफरेचा ५४ मिनिटांत १७-२१, २१-१७, २१-१३ गुणांनी पराभव केला. जागतिक क्रमवारीत २४व्या क्रमांकावर असलेल्या जयरामला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओबेमोस्टेरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक मानांकनात २८ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणोयने स्विडनच्या माथियस बोर्जला ५७ मिनिटांत १३-२१, २१-११, २१-१५ गुणांनी नमविले. प्रणयचा पुढील सामना कॅनडाच्या बी. आर. संकिर्थविरुद्ध होईल. तिसऱ्या सामन्यात चौथा मानांकित बी. साई प्रणीतने चिनी ताईपैच्या कान चाओ यू ला ४० मिनिटांत २६-२४, २१-१६ गुणांनी नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ३७ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतची पुढील
लढत वेनचाओ शी याच्या विरुद्ध होणार आहे. इतर सामन्यांमध्ये भारताच्या प्रतुल जोशीने स्कॉटलंडच्या एलिस्टेयर कासीला ३० मिनिटांत २१-१३, २१-१२ असे पराभूत केले.
दुसरीकडे भारताच्या हर्षल दाणींना पुढे चाल मिळाली आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तने कॅनडाच्या जोनाथन लाईला अवघ्या २० मिनिटांत २१-८, २१-६ गुणांनी नमवित आपले विजयी अभियान सुरू ठेवले.
(वृत्तसंस्था)
महिला गटात भारताच्या तन्वी लाडने डेन्मार्कच्या जूली फिनइपस्त्रचा २१-१७, २१-१० गुणांनी ३० मिनिटात फडशा पाडून पुढची फेरी गाठली.
दुसरीकडे रुत्विका शिवानीने कॅनडाच्या काइली ओ डोनोगुयला २१-१४, २१-१४ असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीत मनु अत्री व अश्विनी पोनप्पाने कॅनडाची बाइरोन होलचेक व इरिन ओ डोंगहुये या जोडीला १८ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.