प्रणय, श्रीकांत उपांत्य फेरीत

By admin | Published: June 17, 2017 02:57 AM2017-06-17T02:57:40+5:302017-06-17T02:57:40+5:30

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय याने इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्याने रियो आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या

Prannoy, Shrikant in the semifinals | प्रणय, श्रीकांत उपांत्य फेरीत

प्रणय, श्रीकांत उपांत्य फेरीत

Next

जकार्ता : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणय याने इंडोनेशियन बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये मोठा उलटफेर केला आहे. त्याने रियो आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेन लोंग याला पराभूत करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तर किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.
भारताचा एच.एस. प्रणय या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गुरुवारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आणि जागतिक पातळीवर अव्वल रँकिग असलेल्या ली चोंग वेई याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता पुन्हा एकदा प्रणयने अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्याने आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या आणि आठव्या मानांकित चिनी खेळाडू चेन लोंगला पराभूत केले. एक तास १५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणय याने २१-१८,१६-२१,२१-१९ असा विजय मिळवला. या लढतीत पहिला गेम प्रणय याने सहज जिंकला. त्याने सुरुवातीलाच घेतलेल्या आघाडीचा फायदा त्याला मिळाला. मात्र दुसऱ्या गेममध्ये चेन लोंग याने पुनरागमन केले. त्याने प्रणयवर आघाडी घेत दुसरा गेम जिंकला, त्यामुळे सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेमपर्यंत खेचला गेला. अखेरचा गेम प्रणय याने २१-१९ असा जिंकत सामना खिशात घातला. २५ वे रँकिंग असलेल्या प्रणय याने पात्रता फेरीतून स्पर्धेत प्रवेश नक्की केला आहे. त्याला चेन लोंग याच्यासोबत याआधी झालेल्या तिन्ही लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. आज त्याने लोंग विरुद्धचा पहिला विजय नोंदवला. तसेच या सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे.
भारताच्याच किदाम्बी श्रीकांत याने तैवानच्या जु वेई वांग याला २१-१५, २१-१४ असे पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा निश्चित केली. श्रीकांत याने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. त्याने वांग याला प्रतिकाराची संधीदेखील मिळू दिली नाही. दोन्ही गेममध्ये मोठी आघाडी घेत त्याने विजय मिळवला.
प्रणयची पुढची लढत जपानचा काजुमासा सकाई आणि इंग्लंडचा राजीव ओसफ यांच्यातील विजेत्यासोबत होईल. तर श्रीकांतचा उपांत्य फेरीतील सामना कोरियाच्या दुसऱ्या मानांकित साने वान याच्याशी होणार आहे. (वृत्तसंस्था)

आजचा सामना कठीण होता. मात्र मला आपण चांगला खेळ करू, असा विश्वास होता. मला वाटते की चांगल्या फिटनेसमुळे मी अखेरपर्यंत खेळू शकलो. इंडिया ओपन आणि एशिया बॅडमिंटननंतर प्रशिक्षक मुलयो हांडोयो यांच्या मार्गदर्शनात फिटनेसवर काम केले. त्याचा चांगला परिणाम जाणवत आहे. - एच.एस. प्रणय

Web Title: Prannoy, Shrikant in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.