प्रणय, श्रीकांत विजयी
By admin | Published: June 16, 2017 03:59 AM2017-06-16T03:59:23+5:302017-06-16T03:59:23+5:30
भारताच्या एच.एस. प्रणयने जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेईला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन
जकार्ता : भारताच्या एच.एस. प्रणयने जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेईला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
तर किदाम्बी श्रीकांत याने चौथा मानांकित खेळाडू डेन्मार्कचा यान ओ योर्गेसनचा पराभव केला. जगातील २५ व्या क्रमांकाचा खेळाडू एच.एस.प्रणय याला वेई विरोधातील या आधीच्या दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्याने तीन वेळच्या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या वेईला ४० मिनिटात २१-१०, २१-१८ असे पराभूत केले. श्रीकांत याने योर्गेसनला २१ -१५, २०-२२, २१ -१६ ने पराभूत करत अंतिम आठ खेळाडूंमध्ये जागा मिळवली आहे. प्रणय चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या गेममध्ये ६-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आपली आघाडी १०-३ अशी वाढवली. ब्रेकनंतर ही बढत कायम ठेवली. त्याने दुसऱ्या गेममध्ये १०-६ अशी आघाडी घेतली. मात्र ली याने सलग गुण मिळवत १३ -१२ अशी स्थिती निर्माण केली. मात्र प्रणय याने १७-१४ अशी आघाडी घेत ली याला अडचणीत आणले. मात्र ली याने हा स्कोअर बरोबरीत आणला. अखेरीस प्रणय याने हा गेम जिंकत विजय मिळवला. त्यासोबतच ली याचे विक्रमी सातवे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. प्रणयचा पुढचा सामना आॅलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन लोंगसोबत होईल. तर श्रीकांतचा सामना तैवानच्या झु वेइ वांग आणि एंग का लोंग याच्यातील विजेत्यासोबत होईल. (वृत्तसंस्था)
- जगातील २२ व्या क्रमांकाचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने नववे रँकिंग असलेल्या योर्गेसन याला पराभूत केले. या आधी रियो आॅलिम्पिक स्पर्धेत दोघांची लढत झाली होती. पहिला गेम स्कोअर १० -१० असा होता. त्यानंतर श्रीकांत याने १७-१५ अशी आघाडी घेतली आणि गेम जिंकला. दुसरा गेम जिंकत योर्गेसन याने बरोबरी साधली. मात्र निर्णायक गेममध्ये श्रीकांतने पुनरागमन करत विजय मिळवला.