प्रशांत मोरे - रश्मी कुमारी राष्ट्रीय कॅरम विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:01 PM2019-02-26T21:01:08+5:302019-02-26T21:01:31+5:30
प्रशांत मोरेने विदर्भच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.
मुंबई : अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमानपदाखाली संपन्न झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ४७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने विदर्भच्या इर्शाद अहमदला २२-२१, २५-१३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्याच माजी राष्ट्रीय विजेत्या झाहीर पाशाने महाराष्ट्राच्या राजेश गोहीलला चुरसशीच्या लढतीत पहिला सेट १०-२५ असा गमाविल्यानंतरही पुढील दोन सेट २३-१०, २५-५ असा जिंकला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या रश्मी कुमारीने जैन इरिगेशनच्या ऐशा महम्मदला १९-७, २५-७ अशी धूळ चारत विजेतेपद पटकाविले. रश्मीचे ही १० वे राष्ट्रीय विजेतेपद असून कॅरममध्ये सर्वाधिक राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकाविणारी कॅरमपटू म्हणून तिने विक्रम केला आहे. यापूर्वी ९ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविण्याचा विक्रम तामिळनाडूच्या ए मारिया इरुदयमच्या ( इंडियन एरलाईन्स ) नावे होता. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत विश्व् विजेत्या एस अपूर्वाने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला २५-९, २०-२५, २५-४ असे हरविले.
महिला वयस्कर गटात महाराष्ट्राच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मालती केळकरने महाराष्ट्राच्याच रोझिना गोदादला ६-२२, १९-१३, १५-१२ असे हरवून विजयावर शिक्कमोर्तब केला. तर पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानाने महाराष्ट्राच्या अस्लम चिकतेला २५-७, २५-८ असे पराभूत करून विजय मिळविला.
विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, सचिव वी डी नारायण, राष्ट्रीय कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण, पुरस्कृत भरतीय आयुर्विमा महामंडळाच्या कुडाळ शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद गुळवणी तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष शांताराम गोसावी व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अवधूत भणगे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील व्हाईट स्लॅम व ब्लॅक करणाऱ्या सर्व विजेत्यांना आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर यांनी प्रत्येकी ५० डॉलर्स तर कुडाळ तालुका कॅरम संघटनेने कोकणी मेव्याचे डबे दिली. स्पर्धेचे इक्विपमेंट पार्टनर सिस्का कॅरम कंपनीतर्फे चारही विजेत्याना सिस्का फायटर बोर्ड भेट देण्यात आले.