हॉकीची लोकप्रियता वाढविण्यास प्राधान्य
By admin | Published: November 16, 2016 12:04 AM2016-11-16T00:04:55+5:302016-11-16T00:04:55+5:30
हॉकीची लोकप्रियता वाढविण्यासह या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले बिगर
नवी दिल्ली : हॉकीची लोकप्रियता वाढविण्यासह या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले बिगर युरोपियन अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी सांगितले. १० वर्षांच्या हॉकी क्रांती रणनीतीवर लक्ष असून त्याची सुरुवात २०१९ मध्ये होणार आहे, असेही बत्रा म्हणाले.
बत्रा यांनी सांगितले, ‘हॉकी क्रांती कार्यक्रमानुसार एफआयएच ९ आंतरराष्ट्रीय संघांदरम्यान ‘होम अॅण्ड अवे’ लीगला सुरुवात करणार आहे. या लीगच्या आधारावरच आॅलिम्पिक आणि विश्वकप पात्रतेचे निकष ठरतील.’
एफआयएचच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना बत्रा म्हणाले, ‘मी हॉकीसाठी योगदान देण्यास इच्छुक असून, या खेळाला लोकप्रिय करण्यास प्रयत्नशील आहे. या योजनेनुसार एफआयएच २०१९ पासून १० वर्षांसाठी हॉकी रिव्होल्युशन कार्यक्रम राबविणार आहे. पुढच्या पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्याचा मुख्य उद्देश आहे. २०१९ मध्ये आपल्याला वर्षभर हॉकी बघता येईल. आम्ही नवी लीग प्रारंभ करणार असून ती महत्त्वाची ठरणार आहे. या ‘होम अॅण्ड अवे’ लीगमध्ये ९ देश सहभागी होतील. ही लीग म्हणजेच आॅलिम्पिक पात्रता व विश्वकप क्वॉलीफायर असेल. लीगमधील अव्वल दोन संघ आॅलिम्पिक व विश्वकपसाठी पात्र ठरतील. लीगचे आयोजन सहा महिने कालावधीचे राहणार असून शनिवारी व रविवारी सामने होतील.’
बत्रा पुढे म्हणाले, ‘आम्ही पाकसारख्या संघांसाठी तटस्थ स्थळांचा पर्याय ठेवला आहे, पण संघाने खेळण्याची तयारी दर्शवायला हवी. हॉकीचे क्षेत्र व महसूल वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. हॉकीचा आफ्रिका, पेन अमेरिका, ओशियाना व आशिया या विभागात विकास करण्याचे माझे मुख्य काम राहील. मी आंतरराष्ट्रीय हॉकी संघांच्या संख्येत वाढ करण्यास प्रयत्नशील आहे. भविष्यात संघांची संख्या १०-१२ पासून वाढून २०-२५ करण्यास मी इच्छुक आहे.’ (वृत्तसंस्था)