प्रशिक्षकपदासाठी शास्त्री, अरुण, बांगर यांची अर्ज करण्याची तयारी
By admin | Published: June 1, 2016 03:29 AM2016-06-01T03:29:30+5:302016-06-01T03:29:30+5:30
भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह त्यांचे सपोर्ट स्टाफचे सहकारी आगामी काही दिवसांमध्ये बीसीसीआयच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत
नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह त्यांचे सपोर्ट स्टाफचे सहकारी संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर आगामी काही दिवसांमध्ये बीसीसीआयच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत.
शास्त्रीसह फलंदाजी प्रशिक्षक बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आगामी काही दिवसांमध्ये आपले अर्ज सादर करतील, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नाव उघड न करण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने सांगितले, की सर्व तिन्ही प्रशिक्षक (अरुण, बांगर, श्रीधर)शास्त्री यांच्यासह अर्ज सादर करणार आहेत. कारण त्यांना बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. अर्ज सादर करावा लागणार असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. ते जाहिरातीची प्रतीक्षा करीत आहेत.
बीसीसीआयच्या सूत्राच्या मते अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षपदी निवड होण्याच्या काही दिवसांपूर्वी सपोर्ट स्टाफने दिल्लीमध्ये त्यांची
भेट घेतली होती. ठाकूर यांनी
सपोर्ट स्टाफच्या कार्याची
प्रशंसा केली होती. सूत्रानी सांगितले, की बीसीसीआयच्या अध्यक्षांनी
स्पष्ट केले, की योग्य व पात्र व्यक्तीला अर्ज करता येईल.