सरावासाठी साईची नियमावली तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:45 AM2020-05-16T04:45:53+5:302020-05-16T04:47:08+5:30
गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतरच खेळाडूंचा सराव सुरू होईल.
नवी दिल्ली : देशभरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई)केंद्रात सराव सुरू करण्याआधी कोरोनापासून बचावाची नियमावली तयार करण्यात आली आहे. तथापि गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतरच खेळाडूंचा सराव सुरू होईल. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या सूचनेनुसार साईने या महिन्याअखेर आपल्या सर्व केंद्रात सराव सुरू करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी नियम(एसओपी)तयार करण्यात आले. त्यात कमी व्हँटिलेशन असलेले चेंजिंग रुम बदलणे, सरावाच्या सुविधांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन, जिमसाठी वेगवेगळ्या वेळेची आखणी आदींचा समावेश आहे. सराव सुरू करण्यासाठी आरोग्य आणि गृह मंत्रालयाची परवानगी अनिवार्य असेल. ३३ पानांची ही नियमावली मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंनी सर्वप्रथम कोरोना चाचणी करून घ्यावी, खेळाडूंनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालावी, शारीरिक अंतराचे पालन करावे, सरावादरम्यान प्रत्येक खेळाडूच्या आरोग्याकडे कर्मचाºयांनी लक्ष द्यावे, अशा काही नियमांचा यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)