सरस कामगिरीसाठी नेमबाज तयार
By admin | Published: February 4, 2016 03:22 AM2016-02-04T03:22:07+5:302016-02-04T03:22:07+5:30
रियोमध्ये यावर्षी होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज तयार असून, लंडन आॅलिम्पिकपेक्षा जास्त संख्येने भारतीय खेळाडूंची निवड या वेळी झाली आहे.
नवी दिल्ली : रियोमध्ये यावर्षी होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज तयार असून, लंडन आॅलिम्पिकपेक्षा जास्त संख्येने भारतीय खेळाडूंची निवड या वेळी झाली आहे. भारतीय खेळाडू पदकांंच्या बाबतीतही लंडन आॅलिम्पिकपेक्षा सरस कामगिरी करण्यासाठीच मैदानात उतरणार आहेत.
येथील कर्णी सिंह शूटिंग रेंजवर मंगळवारी संपलेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत भारताच्या चार जणांनी आॅलिम्पिकचा कोटा मिळविला. याबरोबर आॅलिम्पिकसाठी जाणाऱ्या नेमबाजांची संख्या १२ झाली आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या ११ नेमबाजांनी सहभाग घेतला होता.
चार वर्षांपूर्वी लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके मिळाली होती. विजयकुमार याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्य, तर गगन नारंग याने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळविले होेते. मात्र, या वेळी दोघांव्यतिरिक्त कोणीही पदक पटकावू शकले नाहीत.
लंडन आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा, जॉयदीप करमाकर, विजयकुमार, गगन नारंग, संजीव राजपूत, मानवजीत सिंग संधू, रोंजन सोधी, शगून चौधरी, राही सरनोबत, हिना सिद्धू व अनुराज सिंग यांनी आपले कौशल्य पणाला लावले होते. आशियाई स्पर्धेपूर्वी गगन नारंग, अभिनव बिंद्रा, जीतू राय, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चैन सिंग, अपूर्वी चंदीला व मिराज खान यांनी आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हिना सिद्धूने सुवर्णपदक पटकावीत आॅलिम्पिकसाठी स्थान पक्के केले. लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविलेल्या विजयकुमार याला मात्र रियो आॅलिम्पिकसाठी पात्र होण्यात अपयश आले. आयोनिका पालने १० मीटर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावत भारताला ११ वा कोटा मिळवून दिला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या ५० मीटर रायफल स्पर्धेत संजीव राजपूतने चौथा क्रमांक पटकावीत भारतासाठी आॅलिम्पिक कोटा मिळविला.(वृत्तसंस्था)