धोनीला विकत घेण्यासाठी पॅंट विकायचीही तयारी - शाहरूख खान
By Admin | Published: April 25, 2017 05:06 AM2017-04-25T05:06:23+5:302017-04-25T08:01:01+5:30
""मी तर महेंद्रसिंग धोनीला माझा पायजमा विकूनही संघात घेईल पण तो...
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएल सुरू होण्यापुर्वी पुण्याच्या संघाने कर्णधारपदावरून हटवलं. पुण्याचे संघ मालक हर्ष गोयंका यांनी धोनीबाबत केलेले काही ट्विटही वादात राहीले. पण धोनीच्या चाहत्यांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. शनिवारी(दि.22) झालेल्या सामन्यात मॅचविनिंग खेळी करून धोनीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. धोनीच्या नेतृत्व क्षमतेबाबतही काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. यादरम्यान अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानने धोनीवर प्रतिक्रिया देताना धोनीसारख्या नेतृत्वाला आपल्या संघात घेण्यासाठी पॅंट विकायचीही तयारी असल्याचं म्हटलं आहे.
आयपीएलच्या अकराव्या सत्रात म्हणजे पुढील वर्षी अनेक महत्वाच्या खेळाडूंचा करार संपल्यामुळे पुन्हा लिलाव होणार आहे. धोनीचाही यामध्ये समावेश आहे. चेन्नई सुपरकिंग्स हा संघही पुढील वर्षीपासून पुन्हा एकदा आयपीएलचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा धोनीला आपल्याकडे खेचेल अशी चर्चा आहे. पण एकीकडे गौतम गंभीरच्या कर्णधारपदाखाली सुरेख कामगिरी करत असतानाही धोनीला संघात घेण्याची इच्छा शाहरूखने बोलून दाखवली आहे. स्पोर्ट्सवाल्लाह (Sportswallah) ने याबाबत वृत्त दिलं आहे. ""मी तर धोनीला माझा पायजमा विकूनही संघात घेईल पण तो लिलावामध्ये उपलब्ध व्हायला हवा"" असं शाहरूख खान म्हणाला. यासोबत बंगळुरूवर मिळवलेल्या ऐतिहासीक विजयाचा साक्षीदार होता आलं नाही, दुस-या कामांमुळे तो सामना इडन-गार्डन्सवर जाऊन पाहता नाही आला याचं वाइट वाटत असल्याचंही शाहरूख म्हणाला.
दरम्यान, आता आयपीएलच्या अकराव्या सत्रात चेन्नईचा संघ धोनीला पुन्हा आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरतो की शाहरूखचा कोलकात्याचा संघ त्याला आपल्या ताफ्यात घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.