राष्ट्रपतींच्या हस्ते शानदार सोहळ्यात खेळाडूंचा गौरव, झझारिया, सरदारसिंग यांना ‘खेलरत्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 04:33 AM2017-08-30T04:33:27+5:302017-08-30T04:36:04+5:30
रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत देशाचा गौरव वाढविणारे खेळाडू, कोचेस, मार्गदर्शकांचा अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
२००४ च्या अथेन्स तसेच मागच्या वर्षीच्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये झझारियाने सुवर्णपदक जिंकले. सरदारसिंगच्या नेतृत्वात भारताने अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून यंदा दोघांना संयुक्तपणे प्रत्येकी साडेसात लाख रोख, प्रशस्तिपत्र व खेलरत्न पदक देण्यात आले.
हा पुरस्कार मिळविणारा देशाचा पहिला दिव्यांग खेळाडू असलेल्या झझारियाने दोन्ही सुवर्णपदके मिळविताना विश्वविक्रमाची नोंद केली होती. याशिवाय २०१३ च्या विश्व पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले.
वयाच्या २२ व्या वर्षी २००८ मध्ये सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धा जिंकून देणारा सरदार हा सर्वांत तरुण कर्णधार ठरला होता. याशिवाय दोन आशियाई पदके जिंकून दिल्याबद्दल याआधी त्याचा ‘पद्मश्री’ देऊन गौरव करण्यात आला आहे. आजच्या सोहळ्यात ज्या १७ जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आले, त्यापैकी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा उपस्थित नव्हता. तो सध्या इंग्लंडमध्ये कौंटी खेळण्यात व्यस्त आहे. (वृत्तसंस्था)
हा सन्मान भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देईल. १२ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. आॅलिम्पिक उपांत्यपूर्व सामना गमविल्यानंतर हॉकी सोडून देण्याचे मनात आले होते. पण हॉकीशी माझे नाते अतूट आहे. हा पुरस्कार सहकारी खेळाडू, कोचेस, हॉकी इंडिया आणि माझ्या कुटुंबाला समर्पित करतो. संकटाच्या काळात सर्वांची मला साथ लाभली. सर्वांच्या सहकार्याशिवाय मजल गाठता आली नसती.
- सरदारसिंग
पाच कोटी दिव्यांगांना
पुरस्कार समर्पित : झझारिया
पॅरालिम्पिक खेळांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी हा पुरस्कार देशातील पाच कोटी दिव्यांग खेळाडू, आई आणि मुलगी यांना समर्पित करतो. या पुरस्कारामुळे पॅरा खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. भारतीय क्रीडा प्राधिकरणासह देशातील राज्य शासनांनी दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे मी आवाहन करतो. पॅरा खेळासाठी देशात क्रीडा अकादमीची निर्मिती व्हावी. शिवाय अकादमीचे सूत्रसंचालन माजी पॅरा खेळाडूंकडेच द्यायला हवे.
पुरस्कार विजेते
राजीव गांधी खेलरत्न : देवेंद्र झझारिया (पॅराअॅथलिट), सरदारसिंग (हॉकी).
अर्जुन पुरस्कार : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अॅथलेटिक्स), आरोकिन राजीव (अॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), एल. देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओयनाम बेमबेम (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (नेमबाजी), अॅन्थोनी अंमलराज (टेबल टेनिस), साकेत मिनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियाना (कुस्ती), मरियप्पन थंगावेलू (पॅराअॅथलिट) आणि वरुण भाटी (पॅराअॅथलिट).
द्रोणाचार्य पुरस्कार : दिवंगत डॉ. आर. गांधी (अॅथलेटिक्स), जीएसएसव्ही प्रसाद (बॅडमिंटन), बृजभूषण मोहंती (बॉक्सिंग), पी. ए. राफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशन लाल (कुस्ती)
ध्यानचंद पुरस्कार : भूपेंदरसिंग (अॅथलेटिक्स ), सय्यद शाहिद हकीम (फुटबॉल), सुमराई टेटे (हॉकी).
वादाची परंपरा कायम...
सर्वाधिक टाळ्या पडल्या त्या दिव्यांग क्रीडा पुरस्कार विजेत्यांसाठी. एक खेलरत्नसह तीन पुरस्कार यंदा दिव्यांगांना मिळाले.
अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रोख, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यंदाचे क्रीडा पुरस्कारदेखील वादग्रस्त ठरले. द्रोणाचार्यच्या यादीतून क्रीडा मंत्रालयाने पॅरालिम्पियन कोच सत्यनारायण आणि कबड्डी कोच हिरानंद कटारिया यांची नावे वगळली. पुलेला गोपीचंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने दोन्ही नावांची शिफारस केली होती.
सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असून, कटारिया यांचा कबड्डीशी सुतराम संबंध नाही. पुरस्कारासाठी नाव नसल्याने वेटलिफ्टर संजिता चानू व बास्केटबॉलपटू ए. अनिता यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.
सरकारने या प्रकरणी फेरविचार करण्याचा शब्द दिला आहे. सहा कोचेसना द्रोणाचार्य तसेच तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद जीवनगौरव देण्यात आला.