राष्ट्रपती चालतात, बीसीसीआय प्रशासक का नाही?
By admin | Published: June 30, 2017 01:01 AM2017-06-30T01:01:38+5:302017-06-30T01:01:38+5:30
भारताच्या राष्ट्रपतिपदी ७० हून अधिक वयाची व्यक्ती विराजमान होऊ शकते, मग बीसीसीआय प्रशासनात अधिक वयाची व्यक्ती काम का करू शकत नाही
नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतिपदी ७० हून अधिक वयाची व्यक्ती विराजमान होऊ शकते, मग बीसीसीआय प्रशासनात अधिक वयाची व्यक्ती काम का करू शकत नाही, असा सवाल अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांनी केला आहे.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयने तयार केलेल्या विशेष समितीत शहा यांना कालच आमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.
बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या वयावरून उद्भवलेला वाद माझ्या आकलनापलीकडचा असल्याचे सांगून शहा म्हणाले, ‘आमचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ८१ वर्षांचे आहेत. ७० हून अधिक वयाचे असले तरी सक्रियपणे काम करतात. बीसीसीआयचे अधिकारी या वयानंतर काम करू शकत नाहीत का. जोवर व्यक्ती जिवंत आणि फिट आहे तोवर ती काम करू शकते. लोढा समितीची वयासंबंधीची शिफारस हा माझ्यामते भेदभाव आहे.’
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये शाह यांचा समावेश करण्यात आल्यानंतर पहिली बैठक शनिवारी होणार आहे. पॅनलमध्ये माझा अनुभव कामी येईल. सर्वच सदस्य आपापली बाजू मांडणार असून कोर्टाला सर्वसंमतीचा तोडगा सोपवायचा आहे, असे शहा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)