दबाव भारतावर आहे
By admin | Published: March 14, 2017 12:52 AM2017-03-14T00:52:48+5:302017-03-14T00:52:48+5:30
आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली
रांची : ‘आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली,’ असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा हुकमी फिरकी गोलंदाज नॅथन लिआॅन याने केले.
भारत-आॅस्टे्रलिया कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीमध्ये असून आगामी १६ मार्चला रांची येथे होणाऱ्या सामन्यात बाजी मारून निर्णायक आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मालिकेतील अखेरचा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळविण्यात येईल. सोमवारी आॅस्टे्रलिया संघ बंगळुरू येथून रांची येथे रवाना झाला.
एका आॅस्टे्रलियन प्रसारमाध्यमाशी बोलताना लिआॅनने म्हटले, ‘‘संघात जबरदस्त आत्मविश्वास भरलेला आहे. भारतात येण्याचे सोडूनच द्या. परंतु, विमान पकडण्यापूर्वी आणि दुबईला पोहोचण्यापूर्वीच अनेक जणांनी आम्हाला गृहीत धरले होते. आम्ही या मालिकेचा चषक जिंकण्यापासून केवळ एक विजयाने दूर आहोत आणि आम्ही हेच साध्य करण्यासाठी येथे आलेलो आहोत.’’
मालिकेत यजमानांवर दबाव असल्याचे सांगताना लिआॅन म्हणाला, ‘‘मालिकेमध्ये दबाव भारतीय संघावर असून आमच्यावर काहीच दबाव नाही. सर्वांनीच आमचा पराभव ४-० असा होईल, असे भाकीत केले होते. आमचा संघ चांगला नाही, ते युवा असून सध्या शिकत आहेत. मात्र, सर्वोत्तम संघांना जगात कुठेही नमवण्याचा विश्वास आम्हाला होता.’’ (वृत्तसंस्था)
जखमी असूनही खेळणार...
दुसऱ्या कसोटीदरम्यान हाताच्या बोटाच्या चामडीला दुखापत झाली असूनही आॅसीचा अव्वल फिरकीपटू असलेला नॅथन लिआॅनला तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा आहे. ज्या बोटाने आॅफस्पिनर चेंडू वळवतात, लिआॅनच्या त्याच बोटाच्या चामडीला दुखापत झाली आहे. याबाबत लिआॅन म्हणाला, ‘‘या गरमीच्या दिवसांमध्ये मी खूप गोलंदाजी केली आहे आणि वर्षातून असे १-२ वेळा होते. माझ्या बोटाची केवळ चामडी फाटली आहे. काही वेळासाठी खूप वेदना होत होत्या.’’
लिआॅन म्हणाला, ‘‘अशा परिस्थितीमध्ये मी टेप लावून गोलंदाजी करू शकत नव्हतो. कारण, टेप लावून गोलंदाजी न करण्याबाबत नियम आहेत. त्यामुळे याविषयी मी विचारही करीत नव्हतो.’’
त्याचबरोबर, ‘‘२०१३ च्या भारत दौऱ्यामध्येही तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मला अशीच दुखापत झाली होती. मात्र तरीही तीन दिवसांनंतर मी खेळण्यात यशस्वी झालो होतो. त्यामुळेच, मला रांची येथील कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी आशा आहे,’’ असेही लिआॅनने म्हटले.