मालिका वाचविण्याचे दडपण
By admin | Published: January 29, 2017 04:55 AM2017-01-29T04:55:13+5:302017-01-29T04:55:13+5:30
१५ महिन्यांत पहिल्यांदा टीम इंडियापुढे आपल्याच मैदानावर मालिका गमावण्याचे जबर आव्हान उभे ठाकले आहे. उद्या (रविवारी) व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध
नागपूर : १५ महिन्यांत पहिल्यांदा टीम इंडियापुढे आपल्याच मैदानावर मालिका गमावण्याचे जबर आव्हान उभे ठाकले आहे. उद्या (रविवारी) व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणारा दुसरा टी-२० सामना यजमानांसाठी ‘करा किंवा मरा’ असाच असेल.
भारताने याआधी आॅक्टोबर २०१५मध्ये द. आफ्रिकेला २-३ अशी मालिका गमावली. या मालिकेत कानपूरच्या पहिल्या लढतीत इंग्लंडने बाजी मारल्याने भारताला आज कुठल्याही स्थितीत विजय नोंदविण्याचे आव्हान आहे. या मैदानावर भारताने आधीचे दोन्ही टी-२० सामने गमावल्याचा इतिहास ताजा आहे. त्यामुळेच इंग्लंडवर विजय नोंदवून चुरस कायम राखण्यासाठी विराटला सर्वोत्कृष्ट संघ उतरवावा लागेल.
व्हीसीएवर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने भारताला धूळ चारली होती. फिरकी गोलंदाज मिशेल सेंटनर आणि ईश सोढी यांच्यापुढे भारताची फलंदाजी गारद झाली होती.
रिषभ पंतचे पदार्पण,
बुमराहऐवजी भुवी!
इंग्लिश कर्णधार इयोन मोर्गन फॉर्ममध्ये आहे. वन डेत त्याच्या २८, १०२, ४३, आणि ५१ धावा होत्या. पहिल्या वन डेत त्याने फिरकीच्या चिंधड्या उडविल्या. त्याच्यासह आघाडीचे सहा फलंदाज चांगले असल्याने भारतीय गोलंदाज त्यांना कसे आवर घालतील, हादेखील प्रश्न आहे. इंग्लिश फलंदाजांना फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने त्रस्त केल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय, संघात बदल केल्यास युवा खेळाडू रिषभ पंत याचे संघात पदार्पण होऊ शकेल. स्थानिक मोसमात धावांचा पाऊस पाडणाऱ्या या खेळाडूने मुंबईतील सराव सामन्यातही अर्धशतक ठोकले होते. याशिवाय कानपूरमध्ये राखीव बाकावर बसलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला जसप्रीत बुमराहऐवजी संधी दिली जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)
उत्कृष्ट यॉर्कर हे बुमराहचे वैशिष्ट्य मानले जाते. कानपूर सामन्यादरम्यान नेमका यॉर्कर टाकण्यात तो चुकला होता. अनुभवी आशिष नेहरा हादेखील शस्त्रक्रियेनंतर संघात परतला. सराव सामन्यात त्याने तीन षटकांत ३१ धावा मोजल्या होत्या. त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सामन्यात दवबिंदूंची भूमिका निर्णायक ठरेल, अशी शक्यता व्हीसीएच्या सूत्रांनी व्यक्त केली.(क्रीडा प्रतिनिधी)
फलंदाजीत सुधारणा हवी!
कानपूरमध्ये कोहली, धोनी, युवराज हे दिग्गज इंग्लिश माऱ्याला बळी पडले. नागपुरात युवराजच्या जागी मनीष पांडे याला संधी देण्याचा तसेच के. एल. राहुलचा खराब फॉर्म विचारात घेऊन फलंदाजी क्रम बदलण्याचा कोहली आणि कोच कुंबळे यांना विचार करावा लागणार आहे. भारताने कानपूरमध्ये केवळ १४७ धावा केल्या. त्यात धोनीचे सर्वाधिक ४७ धावांचे योगदान होते.
लक्षवेधी......
व्हीसीएवर हा एकूण ११ वा टी-२० तसेच मागच्या दहा महिन्यांतील दहावा सामना असेल. मागचा सामना २००९मध्ये भारत-श्रीलंका यांच्यात खेळला गेला. भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान या मैदानावर एकूण नऊ सामने खेळविण्यात आले होते.
या दोन्ही संघांमध्ये २००७ ते १७ दरम्यान एकूण ९ सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने ६ तर भारताने ३ सामन्यात विजय नोंदविला आहे.
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, परवेझ रसूल, आशिष नेहरा, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मनदीपसिंग, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन रे, सॅम बिलिंग्स, ज्यो रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस जॉर्डन, लियॉम प्लंकेट, आदिल रशीद, टी. मिल्स, जोनाथन बेयरेस्टो, जॅक बॉल, लियॉम डॉसन, डेव्हिड विले.
सामन्याची वेळ : सायं. ७ पासून
स्थळ : व्हीसीए स्टेडियम जामठा, नागपूर