माजी स्टार्सची प्रतिष्ठा पणाला!
By Admin | Published: April 8, 2016 03:26 AM2016-04-08T03:26:29+5:302016-04-08T03:26:29+5:30
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्राची धडाकेबाज सुरुवात उद्या शनिवारपासून होत आहे. दहा शहरांमध्ये ५९ सामन्यांचे यंदा आयोजन होणार असून, यात अनुभवी खेळाडूंना प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्राची धडाकेबाज सुरुवात उद्या शनिवारपासून होत आहे. दहा शहरांमध्ये ५९ सामन्यांचे यंदा आयोजन होणार असून, यात अनुभवी खेळाडूंना प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल, तर युवा खेळाडूंकडे करियरला उभारी देण्याची संधी राहील. या स्पर्धेच्या रूपाने पुढील सात आठवडे क्रिकेट आणि मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्स हे नाव सध्यातरी इतिहासजमा झाले असल्याने महेंद्रसिंह धोनी पिवळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसणार नाही. यंदा पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स हे दोन नवे संघ पदार्पण करतील.
धोनी हा टी-२० क्रिकेटचा चाणाक्ष कर्णधार मानला जातो. विराट कोहली आक्रमकतेसाठी प्रख्यात आहे. सध्या तो फॉर्ममध्ये आहे. त्याचा हा फॉर्म रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी कायम राहावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. याच संघात ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सदेखील आहेत. गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघात अधिक बदल झालेले नाहीत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात इंग्लंडचा जोस बटलर आहे.
डेअरडेव्हिल्सकडे टी-२० चा नवा स्टार कार्लोस ब्रेथवेट आहे. त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकांत चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकून विंडीजला विजेतेपद मिळवून दिले. झहीर खानकडे या संघाचे नेतृत्व असून, राहुल द्रविडसारखा मेंटर संघाला लाभला आहे.
शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डनवर मोठा पाठिंबा लाभेल; पण प्रश्न हा की सुनील नारायण नव्याने गोलंदाजीत जादू करू शकेल. जॅक कॅलिस कोच असल्याने केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर याच्यावर दडपण वाढले.
सनराइझर्स हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर आणि गोलंदाजीत आशिष नेहरा तसेच मुस्तफिजूर रहमान आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबकडे डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत, पण मिशेल जॉन्सनच्या अनुपस्थितीत त्यांचा गोलंदाजी मारा अर्धवट वाटतो.
> युवा खेळाडूंच्या करिअरला उभारी देण्याची संधी
चेन्नई व राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम आहे. या संघाने आयपीएलवर जादू कायम केली होती. या संघाचा माजी दिग्गज धोनीला आता विजयाची मोट बांधावी लागणार आहे. त्याच्या हाताशी फाफ डुप्लेसिस आणि रविचंद्रन आश्विन हे आहेत. सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे विश्वासू खेळाडू सध्या त्याच्या संघात नाहीत. दिल्ली संघात एल्बी मोर्केल, तर ड्वेन ब्राव्हो लॉयन्सकडे आहे. धोनीकडे केविन पीटरसनच्या रूपात आक्रमक फलंदाज आहे. लॉयन्सचा कर्णधार रैनाकडे ब्रेंडन मॅक्यूलम तसेच ड्वेन स्मिथ यांची ताकद असेल. कोहलीची नजर आता आयपीएल जेतेपदावर आहे. कोहली, गेल, डिव्हिलियर्स यांच्या रूपाने बेंगळुरूकडे सर्वांत धोकादायक फलंदाजांचे त्रिूकट आहे. याशिवाय शेन वॉटसन, सॅम्युअल बद्री, मधल्या फळीत सर्फराज खान आणि केदार जाधव असतील. ब्रेथवेटमुळे डेअरडेव्हिल्स संघाला वलय प्राप्त झाले आहे. गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमीकडे असेल, याशिवाय मागच्या आयपीएलचा हिरो श्रेयस अय्यर, करुण नायर, क्विंटन डिकॉक व ऋषभ पंत यांचा समावेश आहे.
केकेआरकडे मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, शकिब अल हसन आणि दीर्घकाळापासून संघर्ष करीत असलेला युसूफ पठाण आदींचा समावेश आहे. स्पर्धेत सलामीची लढत गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पुणे सुपरजायंट्स यांच्यात होणार आहे. प्ले आॅफ सामने २४, २५ आणि
२७ मे रोजी तसेच अंतिम सामना २९ मे रोजी खेळविला जाईल.