खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:56 PM2020-01-08T19:56:07+5:302020-01-08T20:00:34+5:30
आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई : भारतातील खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेला १० जानेवारीपासून गुवाहाटी येथे सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधाननरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्याच्या घडीला देशामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. या गोष्टीचे तीव्र प्रतिसाद आसामध्ये उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. मोदी जर गुवाहाटीला या स्पर्धेसाठी गेले तर त्यांना तीव्र विरोध होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मोदी यांनी हा दौरा रद्द केल्याचे समजते आहे.
‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’
काही दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध गुवाहाटीत तीव्र निदर्शने झाली होती. यादरम्यान शहरामध्ये कफर््यूही लावण्यात आला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून स्पर्धेदरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही खेलो इंडिया यूथ गेम्सचे सीईओ अविनाश जोशी यांनी दिली. यासंदर्भात ते म्हणाले की, ‘नक्कीच काही दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, परंतु आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून येथे कोणालाही त्रास होणार नाही. खेळाडूंच्या वास्तव्याच्या ठिकणी व स्पर्धा ठिकाणी कडक सुरक्षा असेल. याशिवाय खेळाडूंच्या प्रवास मार्गावर व वाहनांमध्येही सुरक्षा रक्षक तैनात असतील. त्यामुळे गुवाहाटी पूर्णपणे सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतली आहे.’
देशाच्या संस्कृतीचे दर्शन
स्पर्धेदरम्यान आसामव्यतिरिक्त देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होईल. यासाठी आयोजकांनी प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क करुन त्यांना कार्यक्रमाची कल्पना दिली आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारताची संस्कृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळेल. त्याचप्रमाणे काही खेळाडू सांस्कृतिक कला सादर करण्यास उत्सुक असल्यास त्यांनाही आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तीन दिवसांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या स्पर्धेत अनोखा ठरेल. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती यावेळी मिळाली.
आसामच्या खेळाडूंना मिळणार रोख पारितोषिक
युवा खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, तसेच त्यांना भविष्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेतील आसामच्या पदक विजेत्या खेळाडूंना विशेष रोख पारितोषिक देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. यानुसार सुवर्ण विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.