Paris Olympic 2024 : ...म्हणून मनू भाकरचं हे यश खूप खास; मोदींकडून पदकविजेत्या खेळाडूचं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:00 PM2024-07-28T17:00:20+5:302024-07-28T17:00:50+5:30
Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताच्या २२ वर्षीय मनू भाकरने कांस्य पदक जिंकले.
Paris Olympic 2024 Lates News | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकविजेत्या मनू भाकरचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली महिला शिलेदार ठरल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनूचे तोंडभरून कौतुक केले. भारतासाठी पहिले पदक जिंकणारी खेळाडू म्हणून मनू भाकरच्या नावाची नोंद झाली आहे. तिने शूटींगमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. विशेष बाब म्हणजे या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. (manu bhaker wins medal) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनू भाकरच्या खेळीला दाद दिली.
एक ऐतिहासिक पदक... मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचे हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
A historic medal!
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2024
Well done, @realmanubhaker, for winning India’s FIRST medal at #ParisOlympics2024! Congrats for the Bronze. This success is even more special as she becomes the 1st woman to win a medal in shooting for India.
An incredible achievement!#Cheer4Bharat
मनू भाकर कोण आहे?
पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.