पंतप्रधान मोदी खेळाडूंसोबत आज चर्चा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 05:52 AM2016-07-04T05:52:13+5:302016-07-04T05:52:13+5:30
रिओ-द-जानेरिओमध्ये होणाऱ्या आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंची आज, सोमवारी भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ-द-जानेरिओमध्ये होणाऱ्या आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंची आज, सोमवारी भेट घेणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी खेळाडूंसोबत चर्चा करणार असून, ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेणार आहेत. सोमवारी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये हा कार्यक्रम होईल. आतापर्यंत १३ क्रीडाप्रकारांत जवळजवळ १०० खेळाडूंनी आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. पंतप्रधान खेळाडूंसोबत अनौपचारिक चर्चा करतील आणि जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देतील.’ भारत या वेळी आॅलिम्पिकमध्ये सर्वांत मोठे पथक पाठवीत आहे. (वृत्तसंस्था)