Grandmaster R Praggnanandhaa : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा इंगा दाखवणाऱ्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 04:37 PM2022-02-23T16:37:47+5:302022-02-23T16:38:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi) बुधवारी भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi) बुधवारी भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे कौतुक केले. आर. प्रज्ञानंद याने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचा एकतर्फी पराभव केला. सोमवारी सकाळी प्रज्ञानंदने कार्लसनचा विजयी अश्वमेध रोखताना काळ्या मोहऱ्यांसह ३९ व्या चालीअखेर त्याच्यावर मात केली. पण पहिल्या फेरीच्या १५व्या चरणात प्रज्ञानंदला रशियाच्या व्लादीस्लाव अर्तमीव याने पराभूत केले. या पराभवामुळे प्रज्ञानंदला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारता आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञानंदचे कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट केले की,'' युवा प्रतिभावान आर प्रज्ञानंदच्या यशाने आम्हा सर्वांना आनंद झाला. त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा सार्थ अभिमान आहे. प्रज्ञानंदला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.''
We are all rejoicing on the success of the young genius R Praggnanandhaa. Proud of his accomplishment of winning against the noted champion Magnus Carlsen. I wish the talented Praggnanandhaa the very best for his future endeavours. @rpragchess
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2022
'अनुभवी व प्रतिभावान मॅग्नस कार्लसनला पराभूत करणं... आणि त्यातही काळ्या मोहऱ्यांसह खेळताना वर्ल्ड चॅम्पियनला धूळ चारलं हे खरंच जादुई आहे. प्रग्यानंद, तू भारताचा अभिमान आहेस, असं ट्वीट करत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आर प्रग्यानंदचे कौतुक केलं होतं.
कोण आहे प्रज्ञानंद?
- आर प्रज्ञानंदचं पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असं आहे. प्रज्ञानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ साली चेन्नईमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रज्ञानंदने बुद्धिबळ खेळू नये असं त्याच्या वडिलांचं मत होतं. पण त्याची बुद्धिबळातील प्रगती पाहता कुटुंबाने त्याला बालपणापासूनच पाठिंबा दिला.
- प्रज्ञानंदची मोठी बहिण वैशाली ही देखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. दोन मुलांना बुद्धिबळ शिकवणं शक्य नसल्याने वडिलांचा प्रज्ञानंदच्या बुद्धिबळाला विरोध होता. पण बालपणापासून मोठ्या बहिणीला बुद्धिबळ खेळताना पाहून प्रज्ञानंदलाही बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.
- प्रज्ञानंदने World Youth Chess Championships Under-8 चे विजेतेपद २०१३ साली पटकावले. त्यामुळे त्याला अवघ्या सातव्या वर्षी फिडे (FIDE) मानांकन मिळाले. २०१५ साली त्याने दहा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले.
- प्रज्ञानंदने २०१६ साली नवा इतिहास रचला. सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचा मान प्रज्ञानंदने २०१६ मध्ये मिळवला. त्यावेळी त्याचे वय अवघे १० वर्षे १० महिने आणि १९ दिवस इतकेच होतो.
- प्रज्ञानंद ९०व्या मानांकनासह बुद्धिबळ विश्वचषक २०२१ मध्ये सहभागी झाला होता. चौथ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला Maxime Vachier-Lagrave याने पराभूत केले. प्रज्ञानंदने २०२२ साली Masters विभागातही सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला सव्वा पाच गुणसंख्येसह १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले.