"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:13 PM2024-10-02T18:13:21+5:302024-10-02T18:20:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राच्या आईला खास पत्र लिहिले.
neeraj chopra olympics 2024 : सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. नीरजच्या या यशानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या आईसाठी एक खास पत्र लिहिले. मोदींनी पत्राद्वारे म्हटले की, सरोज देवी जी, तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा आहे. काल मला जमैकाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नीरजला भेटण्याची संधी मिळाली. या चर्चेदरम्यान त्याने मला तुमच्या हाताने बनवलेला स्वादिष्ट चुरमा दिल्याने खूप आनंद झाला. हा चुरमा खाल्ल्यानंतर तुम्हाला पत्र लिहिण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. नीरज अनेकदा माझ्याशी या चुरमाविषयी बोलत असतो, पण आज तो खाऊन मी भावुक झालो. तुमच्या या अपार काळजी आणि आपुलकीमुळे मला माझ्या आईची आठवण आली.
मोदी यांनी पुढे लिहिले की, आई ही शक्ती, आपुलकी आणि समर्पणाचे रुप असते. नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधी हा प्रसाद मला आईकडून मिळाला हा योगायोगच आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत मी उपवास करतो. एकप्रकारे तुमचा हा चुरमा माझ्या उपवासाच्या आधी माझा मुख्य आहार बनला आहे. तुम्ही बनवलेले जेवण नीरज भाऊला देशासाठी पदक जिंकण्याची ऊर्जा देते. तसेच हा चुरमा मला पुढील ९ दिवस देशसेवेचे बळ देईल. या शक्तीपर्व नवरात्रीच्या निमित्ताने, मी तुमच्यासह देशाच्या मातृशक्तीला आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी मी अधिक सेवेच्या भावनेने काम करत राहीन. आपले मनःपूर्वक आभार.
PHOTO | PM Modi's letter to India's two-time Olympic medal-winning javelin throw star Neeraj Chopra's mother Saroj Devi.
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/QjnePhYWFM
दरम्यान, नीरज चोप्राच्या सोनेरी कामगिरीमुळे भालाफेक या खेळाची भारतातील कानाकोपऱ्यात माहिती पोहोचली. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत सलग दोनवेळा नीरजने पदक जिंकण्याची किमया साधली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये तो दुखापतग्रस्त असताना देखील सहभागी झाला. पण, यावेळी त्याला सुवर्ण नाहीतर रौप्य जिंकण्यात यश आले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक कामगिरी करुन सुवर्ण पदक पटकावले.