प्रियांक पांचलचे शतक
By admin | Published: January 2, 2017 12:41 AM2017-01-02T00:41:27+5:302017-01-02T00:41:27+5:30
रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालने रविवारपासून झारखंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत
नागपूर : रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालने रविवारपासून झारखंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना शतकी खेळी केली. पण गेल्या लढतीत ३५९ धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या समित गोहेलने (१८) मात्र निराश केले.
टीम इंडियाचा वन-डे व टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनी झारखंड संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व्हीसीए सिव्हिल लाईन्स स्टेडियममध्ये उपस्थित होता, पण त्याला त्याच्या गृह संघातील गोलंदाज खूश करू शकले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी गुजरातने पहिल्या डावात ३ बाद २८३ धावांची मजल मारली होती. शतकवीर प्रियांक पांचाल (१४४ धावा, २५२ चेंडू, २१ चौकार) नाबाद आहे. त्याचे यंदाच्या मोसमातील हे पाचवे शतक आहे. त्याला दुसऱ्या टोकाकडून मनप्रीत जुनेजा (१२) साथ देत होता.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पांचाल व गोहेल यांनी सलामीला ६२ धावांची भागीदारी केली. गोहेल माघारी परतल्यानंतर पांचलने भार्गव मेराईसोबत (३९) दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची, तर कर्णधार पार्थिव पटेलसोबत (६२) तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली.
पार्थिवने लौकिकाला साजेशी फलंदाजी केली, पण कौशल सिंगने त्याला पायचित करीत झारखंड संघाला दिलासा मिळवून दिला. पार्थिवने ११५ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १ षट्कार लगावला. झारखंडतर्फे गोलंदाजी करताना विकास सिंगने ४८ धावांत दोन, तर कौशल सिंगने ५२ धावांत एक बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)