भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर
By प्रसाद लाड | Published: September 10, 2018 08:24 PM2018-09-10T20:24:24+5:302018-09-10T20:25:50+5:30
मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही.
मुंबई : भारतामध्ये खेळाला चांगली चालना मिळत आहे. प्रो-बॉक्सिंगला तर भारतात 'अच्छे दिन' आले आहेत, असे मत जर्मनीचा अपराजित प्रो-बॉक्सर मारिओ दसेर याने व्यक्त केले आहे. मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. हा काही दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यामध्ये त्याने 'लोकमत'शी खास संवाद साधला.
मारिओ भारतातील प्रो-बॉक्सिंगबद्दल म्हणाला की, " भारतामध्ये सध्याच्या घडीला प्रो-बॉक्सिंगला चांगले दिवस आले आहेत. भारतामध्ये विजेंदरसारखे खेळाडू जोडले गेल्याने या खेळाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळेच या खेळाचे भारतातील भवितव्य उज्ज्वल आहे. भारताची क्रमवारीमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. पण भविष्यात भारत हा अव्वल देशांपैकी एक नक्कीच होऊ शकतो. "
विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे
सध्याच्या घडीला माझी जोरदार तयारी सुरु आहे. मला आता वेध लागले आहेत ते विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायचे. ही स्पर्धा डोळ्यापुढे ठेवूनच मी तयारी करत आहे, असे मारिओ म्हणाला.
मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नये
बऱ्याचदा पालक काही गोष्टी आपल्या मुलांवर लादत असतात. पण माझ्यामते मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नये. जर मुलांना एका गोष्टीमध्ये रस असेल तर त्याला ती गोष्ट करायला द्यावी, तरच भारतामध्ये अधिक चांगले खेळाडू घडू शकतील, असे मारिओने सांगितले.