प्रो कबड्डी लिलाव : नितिन तोमरने चिल्लरला टाकले मागे
By admin | Published: May 22, 2017 07:50 PM2017-05-22T19:50:19+5:302017-05-22T22:43:55+5:30
प्रो-कबड्डीच्या पाचव्या सत्रासाठी खेळाडूचा लिलाव सुरु असून या खेळाडूंच्या आत्तापर्यंच्या लिलावामध्ये मनजित चिल्लर याने जबरदस्त वर्चस्व राखले.
Next
- रोहित नाईक/ ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - प्रो कबड्डीच्या आगामी मोसमासाठी झालेल्या लिलावामध्ये सेनादलाच्या नितिन तोमरने मना विक्रम रचताना तब्बल ९३ लाख रूपयांची किंमत मिळवली. रूपाने त्याला विक्रमी किंमत देऊन आपल्या संघात घेतले. विशेष म्हणजे याआधी स्टार अष्टपैलू मनजीत चिल्लरने ७५.५० लाखांचा किंमत मिळवून उच्चांक प्रस्थापित केला होता.
परंतु नितिनने हा उच्चांक सोडताना नवा विक्रम रचला. त्याचबरोबर यासह नितिनने प्रो कबड्डीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडूचा मानही मिळवला. नितिनला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघांमध्ये तुफान चढाओढ लागली. त्यामुळे २० लाखांची मुळ किंमत असलेला नितिन बघता बघता ८० लेखांच्या पुढे गेला. नितिन अवाक्याबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतर हळुहळु एक एक संघ माघार घेऊ लागला. परंतु, यूपीने अखेरपर्यंत बोली लावताना बाजी मारली. एक करोडची जादुई किंमत मिळविण्यास नितिन थोडक्यात हुकला.
सेनादलाच्याच रोहित कुमारने प्रो कबड्डी लिलावामध्ये धमाल उडवली. मुळ किंमत २० लाख असताना फ्रँचाईजींनी त्याच्यासाठी थेट ५० लाखांपासून बोली लावण्यास सुरूवात केली. रोहितसाठीही सर्वच संघांनी कंबर कसली. परंतु अखेर बंगळुरू बुल्सने ८१ लाखांमध्ये रोहितला आपल्या संघात घेतले.
या लिलावामध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूवर १२ फ्रँचाईजीपैकी कोणीही बोली लावली नाही. या लिलावामध्ये ४०० खेळाडूंचा सहभाग होता. प्रत्येक संघाला आपल्या संघात १८ ते २५ खेळाडू विकत घेण्याची आणि खेळाडू विकत घेण्यासाठी ४ कोटींपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या ‘अ’ गटामध्ये झालेल्या लिलावामध्ये मनजीतने एकहाती वर्चस्व राखले. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी बंगाल वॉरियर्स, हरियाणा, पुणे पलटन यांच्यामध्ये जोरदार चुरस रंगली. परंतु, अभिषेक बच्चनने अखेरपर्यंत मनजीतसाठी प्रयत्न सोडले नाही आणि त्याला विक्रमी किंमतीमध्ये आपल्या संघात घेतले. त्याचप्रमाणे, याआधी तेलगू टायटन्सकडून खेळलेला स्टार अष्टपैलू संदीप नरवालनेही मोठी किंमत मिळवली असून त्याला ६६ लाखांच्या मोठ्या किंमतीमध्ये पुणेरी पलटणने आपल्या संघात घेतले. तसेच, यंदा प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करीत असलेल्या उत्तर प्रदेश संघाने लक्षवेधी बोली लावताना राजेश नरवालसाठी ६९ लाख रुपये खर्च केले. भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू राकेश कुमारला ४५ लाखांमध्ये तेलगू टायटन्सने आपल्या संघात घेतले.
दरम्यान, याआधी झालेल्या परदेशी खेळाडूंच्या लिलावामध्ये इराणच्या अबोझर मोहजेरमीघनी सर्वाधिक ५० लाखांची किंमत मिळवताना गुजरात संघात प्रवेश केला. त्यानंतर अबोलफझेल मघसोद्लो याला ३१.८० लाखांची किंमत मिळाली असून दबंग दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले.
या लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर कशी बोली लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, सध्या पाकिस्तानला होत असलेला कडवा विरोध आणि दोन्ही देशांमधील सध्याचे बिघडलेले वातावरण पाहता कोणत्याही फ्रँचाइजीने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला नाही. पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रो कबड्डीचे आयुक्त अनुपम गोस्वामी आणि स्पर्धा आयोजक चारु शर्मा यांनी सांगितले की, ‘आम्ही खेळाच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज भलेही दोन्ही देशांतील संबध तणावाचे असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिस्तानचे योगदान विसरता कामा नये. मात्र तरी पाकिस्तानी खेळाडूंना भारताचा व्हिसा मिळणार की नाही याबाबत अंतिम निर्णय भारतीय सरकारचा असेल. त्यांनी जर व्हिसा नाकारला तर आम्ही काहीच करु शकणार नाही. व्हिसा देण्याचे काम त्यांचे आहे. त्यामुळे सरकारचा जो काही अंतिम निर्णय असेल, तो आम्हाला मान्य आहे.’
लिलाव झालेले खेळाडू :
अव्वल भारतीय खेळाडू ‘अ’ गट (मुळ किंमत २० लाख)
- नितिन तोमर - उत्तर प्रदेश (९३ लाख)
- मनजीत चिल्लर - जयपूर (७५.५० लाख)
- राजेश नरवाल - यूपी (६९ लाख)
- संदीप नरवाल - पुणे (६६ लाख)
- कुलदीप सिंग - मुंबई (५१.५० लाख)
- रण सिंग - बंगाल (४७.५० लाख)
- राकेश कुमार - तेलगू (४५ लाख)
.................
परदेशी खेळाडू :
‘ब’ गट (मुळ किंमत - १२ लाख)
१. अबोझर मोहजेरमिघनी - गुजरात (५० लाख)
२. अबोलफझेल मघसोद्लो - दिल्ली (३१.८० लाख)
३. फरहाद रहिमी मिलाघरदन - तेलगू (२९ लाख)
४. खोमसान थोंगखाम - हरियाणा (२०.४० लाख)
५. हादी ओस्तोरक - मुंबई (१८.६० लाख)
६. झिउर रहमान - पुणे (१६.६० लाख)
७. सुलेमान कबिर - यूपी (१२.६० लाख)
‘क’ गट (मुळ किंमत ८ लाख)
१. ताकामित्सु कोनो - पुणे (८ लाख)
२. योंगजू ओके - मुंबई (८.१० लाख)
३. डोंगगेआॅन ली - मुंबई (२० लाख)
४. मोहम्मद माघसौद्लू - पटणा (८ लाख)
......................................
या पाकिस्तानी खेळाडूंवर झाले दुर्लक्ष
१. हसन राझा
२. वासिम सज्जाद
३. नासिर अली
४. आतिफ वाहीद
.....................................
संरक्षक असलेल्या मोहित चिल्लरने गतवर्षी सर्वाधिक 53 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे मला यंदा त्याहून अधिक किंमत मिळेल याची खात्री होती कारण मी अष्टपैलू आहे. मी माझा नैसर्गिक खेळ कायम ठेवणार असून जयपूर संघात आल्याचा आनंद आहे. तरी, राकेश कुमार माझ्या संघात येऊ शकला नाही याची खंत आहे. आता, नव्याने सुरुवात करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे.
- मनजीत चिल्लर