Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार!

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2018 08:39 AM2018-10-30T08:39:14+5:302018-10-30T08:47:11+5:30

आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. याच नकारात्मक वागणुकीमुळेच लढण्याचे बळ दिले आणि आज तो एक उत्तम कबड्डीपटू झाला आहे.

pro kabaddi league 2018: Maharashtra shrikant jadhav raid to chase his dreams | Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार!

Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार!

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय संघात स्थान मिळवण्याचे आणि सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य  यूपी संघाकडून खेळत असलो तरी महाराष्ट्रा एवढेच प्रेम मिळते, कबड्डीचे चाहते हे सीमावाद मानत नाहीत

आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. त्यांच्या याच नकारात्मक वागणुकीमुळेच मला लढण्याचे बळ दिले आणि आज मी एक उत्तम कबड्डीपटू झालो आहे.. आता तीच माणसं माझे कौतुक करताना थांबत नाहीत, महाराष्ट्रातील कबड्डीपटू श्रीकांत जाधव सांगत होता... प्रो कबड्डी लीगमध्ये तो यूपी योद्धा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रो कबड्डीमधील हे त्याचे चौथे सत्र असले तरी इथपर्यंतची त्याची वाटचाल काटेरी राहिली आहे. हलाखीची परिस्थिती, कबड्डीला घरच्यांचा विरोध, अपयशाचे सत्र, शेजाऱ्यांचे टोमणे या सर्वातून श्रीकांत उभा राहिला. 

अहमदनगरमधील दहिगावणे खेड्यात श्रीकांतचे बालपण.. आई-वडील दोघेही शेतकरी... पंक्चरच्या छोट्याशा दुकानातून वडिलांनी शेतीसाठी जागा घेतली अन्  श्रीकांतसह तीन भावंडांना वाढवले. श्रीकांत घरी मोठा असल्याने त्याने शिकावं आणि एक चांगली नोकरी करावी ही घरच्यांची इच्छा.. पण श्रीकांतला कबड्डीचे वेड.. २०११ साली त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. पण २०१२ मध्ये काही कारणास्तव त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) केंद्र सोडावे लागले. त्यानंतर शेजाऱ्यांचे टोमणे सुरू झाले, घरचेही विरोधातच होते.  "या अशा परिस्थितीमुळे मी कबड्डी खेळणं सोडलं. सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अकादमी जॉईन केली. तेथेही अपयश आले. नियतीने पुन्हा कबड्डी खेळण्याची संधी दिली. विदर्भातील अमरावती संघाचे प्रतिनिधित्व करताना कामगिरीचा आलेख उंचावला. प्रो कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पॅंथर संघाने मला घेतले... पण," इतके सांगून श्रीकांत थांबला. 



त्याला दुखापत झाली आणि प्रो लीगचा हंगाम सोडावा लागला. खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी घरच्यांकडे पैसेही नव्हते. अशावेळी त्याचे मित्र उभे राहिले. त्याच्या यशात मित्रांचा मोलाचा वाटा आहे. त्याने सांगितले," कदाचित मित्र त्यावेळी माझ्यासाठी उभे नसते राहिले, तर एक कबड्डीपटू म्हणून मी तुमच्या समोर दिसलो नसतो. अशोक व रवी गाढे या मित्रांनी मला बरीच आर्थिक मदत केली. दुखापतीमुळे दोन वेळा खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, अशा वेळी हे मित्र उभे राहिले." 


आज चौथ्या सत्रात खेळताना सर्व कर्ज मिटवून तो घराचा डोलारा समर्थपणे सांभाळत आहे. तो शिकू शकला नाही, परंतु लहान बहीण भावांना शिकवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. "मागच्या दोन सिजनमधून लोकांचे कर्ज फिटवलं. आता परिस्थिती सुधारली आहे. बहीण-भावाच्या शिक्षणाचा खर्च मी करतो. भाऊ 12वीत आहे बहीण स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे... ती चौदावीला आहे. त्यांना खेळात रस नाही, परंतु त्यांना शिकण्याची आवड आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन," असे श्रीकांतने सांगितले.

Web Title: pro kabaddi league 2018: Maharashtra shrikant jadhav raid to chase his dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.