Pro Kabaddi League 2021-22: आज रंगणार तीन सामन्यांचा थरार; कोण पडेल कोणावर भारी.. पाहा आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:17 PM2021-12-22T15:17:21+5:302021-12-22T15:19:44+5:30
कोरोनामुळे स्पर्धेचा गेल्या वर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला होता. यंदाही कोरोनाचं सावट पूर्णपणे गेलं नसल्याने ही स्पर्धा बंगळुरूमध्ये बायो-बबलमध्ये खेळवली जाणार आहे.
Pro Kabaddi League 2021-22 Head to Head: प्रो कबड्डी ही भारतातील एक लोकप्रिय अशी स्पर्धा आहे. आयपीएल (क्रिकेट) आणि आयएसएल (फुटबॉल) या दोन स्पर्धांप्रमाणेच प्रो कब़ड्डीलादेखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो. तब्बल दोन वर्षांच्या अंतराने ही स्पर्धा पुन्हा एकदा भरवण्यात येत आहे. कोरोनामुळे स्पर्धेचा गेल्या वर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला होता. यंदाही कोरोनाचं सावट पूर्णपणे गेलं नसल्याने ही स्पर्धा बंगळुरूमध्ये बायोबबलमध्ये खेळवली जाणार आहे. तब्बल ६६ सामन्यांची ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेची सुरूवात आज तीन धडाकेबाज सामन्यांनी होणार आहे. याच सामन्यांबद्दल जाणून घेऊया काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स-
यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स - फजल अत्राचलीचा यू मुंबा संघ आज पवन सेहरावतच्या बंगळुरू बुल्ससमोर उभा ठाकणार आहे. पवनचा पूर्ण वेळ कर्णधार म्हणून हा पहिलाच हंगाम असणार आहे. फजल मात्र सगल तिसऱ्या हंगामात आपल्या संघाचं नेतृत्व करत आहे. या दोन संघांच्या संपूर्ण स्पर्धेच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर यू मुंबाचं पारडं जड आहे. एकूण १४ वेळा हे दोन संघ एकमेकांविरूद्ध खेळत असून यू मुंबाने १० वेळा तर बंगळुरू बुल्सने ४ वेळा विजय मिळवला आहे. पण सातव्या हंगामाची (PKL 2019) आकडेवारी पाहिल्यास हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले आणि दोन्ही वेळा बंगळुरू बुल्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा पहिला सामना चांगलाच रोमांचक होणार यात वाद नाही.
तेलुगू टायटन्स विरूद्ध तामिळ थलायवाज - आजच्या दुसऱ्या सामन्यात सिद्धार्थ देसाई असलेला तेलुगू टायटन्स संघ सूरजीत सिंगच्या तामिळ थलायवाजशी दोन हात करणार आहे. या दोन्ही संघांची गेल्या हंगामातील (PKL 2019) कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. स्पर्धेतील या दोन संघांचा एकमेकांविरूद्धचा इतिहास पाहता या दोघांच्यात आठ सामने झाले असून त्यात तेलुगू टायटन्सने पाच तर तामिळ थलायवाजने तीनवेळा विजय मिळवला आहे. गेल्या हंगामात या दोन संघांनी एकमेकांविरोधात १-१ सामना जिंकला होता. पण दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी होते. त्यामुळे कामगिरी सुधारण्याचे आव्हान दोन्ही संघांपुढे असणार आहे.
बंगाल वॉरियर्स विरूद्ध यूपी योद्धा - तिसऱ्या सामन्यात गतविजेते बंगाल वॉरियर्स नव्या दमाच्या युपी योद्धा संघाविरूद्ध मैदानात उतरणार आहेत. यूपी योद्धा संघाला गेल्या हंगामात सलामीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सकडून ४८-१७ असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. पण यंदा त्यांच्या ताफ्यात स्टार खेळाडू प्रदीप नरवालचा समावेश आहे. त्याचा अनुभव त्यांच्या नक्कीच फायद्याचा ठरेल. गेल्या हंगामाच्या दुसऱ्या लढतीत त्यांनी बंगालला धूळ चारण्यात यश मिळवलं होतं. तीच ऊर्जा आजच्या सामन्यात त्यांना विजय मिळवून देऊ शकेल. स्पर्धेतील या दोन संघांचा इतिहास पाहता दोघांमध्ये एकूण आठ लढती झाल्या आहेत. त्यापैकी बंगालने तीन तर यूपीने दोन सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे या सामन्यातही चांगलाच रोमांचक खेळ चाहत्यांना पाहायला मिळेल.
आजचे सामने
यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स - संध्याकाळी ७.३० वाजता
तेलुगू टायटन्स विरूद्ध तामिळ थलायवाज - रात्री ८.३० वाजता
बंगाल वॉरियर्स विरूद्ध यूपी योद्धा - रात्री ९.३० वाजता