Pro Kabaddi League 2021-22: 'यू मुंबा'ने बनवला 'बंगळुरू बुल्स'ला धूळ चारण्यासाठी खास प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:16 PM2021-12-21T17:16:26+5:302021-12-21T17:22:41+5:30
यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स या संघांच्या सामन्याने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला बंगळुरूमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
U Mumba vs Bengaluru Bulls Pro Kabaddi 2021: कोरोनामुळे गेल्या वर्षी रद्द झालेली प्रो कबड्डी लीग स्पर्धा यंदा मात्र जोशात खेळवण्यात येणार आहे. यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स या संघांच्या सामन्याने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला बंगळुरूमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी १२ संघांचे कर्णधार उपस्थित होते. यावेळी सर्व कर्णधारांनी आपल्या संघाची रणनिती आणि स्पर्धेआधीचे विचार व्यक्त केले. याच पत्रकार परिषदेत यू मुंबाचा कर्णधार फजल अत्राचली याने बंगळुरू बुल्सला पराभूत करण्यासाठी एक खास प्लॅन तयार असल्याचं स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेत बोलताना फजल म्हणाला, "यंदा आमच्या संघाची स्पर्धेतील सुरूवात बंगळुरू बुल्स संघाविरूद्ध होणार आहे. बंगळुरूचा संघ कागदावर नक्कीच तुल्यबळ दिसतो. पण असं असलं तरीही आम्ही त्यांच्या प्रत्येक खेळाडूचा सामना कशाप्रकारे करायचा याबद्दल एक प्लॅन तयार केला आहे. तुल्यबळ आणि संतुलित अशा बंगळुरू संघाविरूद्ध आम्ही अतिशय शांत अशा विचारसरणीने मैदानात उतरणार आहोत. सामन्याचं दडपण न घेता जास्तीत जास्त सहज पद्धतीने सामना खेळण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्याकडे वेगवान आणि आक्रमक असे चढाईपटू आहेत. तर दुसरीकडे तंत्रशुद्ध आणि प्रतिभावान असे बचावपटूदेखील आहेत. त्यामुळे सामने नक्कीच अटीतटीचे होतील आणि चाहत्यांना खूप मजा येईल अशी मला खात्री आहे."
पहिल्या सामन्याबद्दल बंगळुरू बुल्सचा कर्णधार पवन सेहरावत यानेही संघाच्या तयारीबद्दल सांगितलं. "आम्ही केवळ एकाच सामन्याचा नव्हे तर संपूर्ण स्पर्धेचा विचार करून आमच्या संघाची रणनिती आखली आहे. सामना सुरू असताना चांगल्यात चांगलं आणि वाईटात वाईट काय-काय होऊ शकतं, याबद्दलचे सगळे विचार आम्ही करून ठेवले आहेत. त्यातूनच सर्वोत्तम निकाल मिळवण्याचा आमच्या संघाचा प्रयत्न असणार आहे. प्रशिक्षक रणधीर सर कायमच आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतात. सर्व खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्याकडे त्यांचा कल असतो. संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत संघाकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घेता येईल यावर त्यांचा भर असतो", असं पवनने सांगितलं.