Pro Kabaddi : शेतकऱ्याचं पोर झालं करोडपती; सिद्धार्थ देसाईला सर्वाधिक भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:00 AM2019-04-09T09:00:00+5:302019-04-09T09:00:50+5:30
Pro Kabaddi Player Auctions 2019 : शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सत्रात धुमाकुळ घातला.
मुंबई, प्रो कबड्डी : शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सत्रात धुमाकुळ घातला. कोल्हापूरच्या हुंदळेवाडी गावातील सिद्धार्थने यू मुंबाकडून पदार्पणातच धमाका केल्या. आपल्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर त्याने सर्व संघ मालकांचे लक्ष वेधले. सिद्धार्थच्या या फॉर्मनंतर यू मुंबा त्याला आपल्या चमूत कायम राखेल असे वाटले होते, परंतु त्यांनी त्याला करारमुक्त केले. त्यामुळे प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात सिद्धार्थकडेच सर्वांच लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे सिद्धार्थने लिलावाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक भाव खाल्ला. यू मुंबासह सर्वच्या सर्व संघांनी सिद्धार्थला आपल्या चमूत घेण्यासाठी कंबर कसली होती. सिद्धार्थसाठीच्या या रस्सीखेचेत तेलगु टायटन्सने बाजी मारली. तेलगु टायटन्सने त्याला 1.45 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
गतवर्षी यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि कामगिरीच्या जोरावर त्याने आपली निवड सार्थ ठरवली. प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वात त्याने ( 221) सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसरे स्थान पटकावले. त्यात सर्वाधिक 218 गुण त्याने चढाईत पटकावले. प्रो कबड्डीमध्ये सर्वात जलद 50, 100 चढाईच्या गुणांचा विक्रमही त्याने नावावर केला. सिद्धार्थसह नितीन तोमरलाही पहिल्या दिवसात करोडपती होण्याचा मान मिळाला. पुणेरी पलटन संघाने त्याला 1.20 कोटीत संघात घेतले.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या सिद्धार्थला यू मुंबाने आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आई-वडील, एक भाऊ अशा छोट्याश्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. वडील शेतकरी आणि आई गृहीणी, त्यामुळे आर्थिक चणचण ही भासायची, परंतु त्याची सबब पुढे न करता सिद्धार्थ स्वप्नांच्या दिशेने चालत राहिला. सातव्या वर्षांपासून त्याने गावातच कबड्डीचे धडे गिरवले.
अव्वल खेळाडूंमध्ये सिद्धार्थ, नितीन, राहुल चौधरी, मोनू गोयत, रिषांक देवाडिगा आणि संदीप नरवाल यांच्यात चुरस पाहायला मिळाली. राहुल चौधरीला ( 94 लाख) तामिळ थलायव्हाज, मोनू गोयतला ( 93 लाख) यूपी योद्धा आणि संदीप नरवालला ( 89 लाख) यू मुंबाने आपल्या ताफ्यात घेतले. परदेशी खेळाडूंमध्ये इराणच्या मोहम्मद नबीबख्शने सर्वाधिक भाव खाल्ला. बंगाल वॉरियर्सने त्लाय 77.75 लाखांत आपल्या चमूत घेतले. त्यापाठोपाठ इराणच्या अबोझार मोहादेर्मिघानी ( 75 लाख, तेलगु टायटन्स), कोरियाचा जँग कून ली ( 40 लाख, पाटणा पाटरेट्स), इराणचा मोहम्मद इस्मैल मघसोधू ( 35 लाख, पाटणा पायरेट्स) व कोरियाचा डाँग जीओन ली ( 25 लाख, यू मुंबा) यांचा क्रमाक येतो.
सिद्धार्थ म्हणाला,''लिलावात माझ्यावर लागलेली बोली पाहिल्यानंतर मी आनंदाने नाचूच लागले. मी सामान्य कुटुंबातील माझा जन्म. वडील शेतकरी आणि त्यामुळे कबड्डीपटू बनण्यासाठी मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तेलगु टायटन्स संघाने दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.''
शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार!