मराठमोळा कबड्डी स्टार सिद्धार्थ देसाई महाराष्ट्राच्या संघाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:48 PM2019-01-25T16:48:03+5:302019-01-25T16:50:18+5:30
प्रो कबड्डी लीग 2018 च्या हंगामात यशस्वी कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले.
मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018 च्या हंगामात यशस्वी कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात मराठमोळ्या सिद्धार्थचाच दबदबा राहिला. त्याने 21 सामन्यांत सर्वाधिक 221 गुणांची कमाई केली होती. त्यामुळे तो स्टार खेळाडू बनला आणि महाराष्ट्राच्या संघाकडून त्याचा खेळ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, 66वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने शुक्रवारी संघ जाहीर केला आणि त्यात सिद्धार्थचे नाव नसल्याने सर्वांना धक्का बसला.
प्रो कबड्डीमुळे स्टार ठरलेल्या सिद्धार्थला रेल्वेने नोकरी देत आपल्या संघात दाखल करुन घेतले. सिद्धार्थने आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला गौरविण्यात आले होते. तरीही त्याचा समावेश अलिबाग येथे पार पडलेल्या महाराष्ट्र संघाच्या शिबिरात सहभागी झालेल्या 12 खेळाडूंमध्ये करण्यात आला होता. महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी सिद्धार्थने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने तो स्वीकारला नाही. त्याला रेल्वेकडूनही ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
रेल्वेकडून सिद्धार्थला ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने अखेरीस शुक्रवारी राज्याचा कबड्डी संघ जाहीर केला. ठाण्याच्या गिरीश ईरनाककडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे 28 ते 31 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
गतवर्षी आपल्या भक्कम बचावाच्या खेळामुळे महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या व प्रो-कबड्डी गाजविणाऱ्या ठाण्याच्या गिरीशच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची माळ पडली. कोल्हापूरच्या तुषार पाटीलला उप कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघात रायगड, पुणे, रत्नागिरी,ठाणे या जिल्ह्याच्या दोन-दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे,तर मुंबई, उपनगर, सांगली, कोल्हापूर यांचा एक-एक खेळाडू या संघात आहे.
महाराष्ट्राचा पुरुष संघ : गिरीश ईरनाक - कर्णधार (ठाणे), तुषार पाटील - उपकर्णधार (कोल्हापूर), विशाल माने (मुं. शहर), रिशांक देवाडीगा (मुं. उपनगर), विकास काळे (पुणे), अमीर धुमाळ (रायगड), निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली), अभिषेक भोजने (रत्नागिरी), सुनील दुबिले (पुणे), अजिंक्य पवार (रत्नागिरी), संकेत बनकर (रायगड). प्रशिक्षक : प्रताप शिंदे (मुं. उपनगर), व्यवस्थापक : मनोज पाटील (ठाणे).