प्रो रेसलिंग आॅलिम्पिक मंचाप्रमाणेच आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:29 AM2018-01-19T02:29:59+5:302018-01-19T02:30:04+5:30
गेल्या तीन सत्रांपासून प्रो रेसलिंग लीगचा स्तर नाट्यमयरित्या उंचावला असून यंदाचे सत्र आधीच्या सत्रांपेक्षा खूप उच्च दर्जाचे झाले आहे. त्याचवेळी एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल
- बजरंग पुनिया, यूपी दंगल मल्ल
गेल्या तीन सत्रांपासून प्रो रेसलिंग लीगचा स्तर नाट्यमयरित्या उंचावला असून यंदाचे सत्र आधीच्या सत्रांपेक्षा खूप उच्च दर्जाचे झाले आहे. त्याचवेळी एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल, की या स्पर्धेदरम्यान घरच्या प्रेक्षकांसमोर किंवा अकादमीच्या खेळाडूंसमोर खेळताना काहीसा दबाव नक्कीच येतो. तरी यंदाच्या सत्रातील माझी कामगिरी म्हणावी तशी यशस्वी झालेली नाही. सोसलन रोमोनोव हा खूप चपळ, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या खूप वरचढ ठरला. माझे गुरू आणि प्रशिक्षक योगेश्वर दत्त यांनी त्याच्याविरुद्ध खेळताना माझ्याकडून झालेल्या चुका अचूकपणे निदर्शनास आणल्या आणि आता आगामी सामन्यांमध्ये मी त्यात नक्कीच सुधारण करण्यात यशस्वी ठरेल. माझी पुढची लढत अमित धनकडविरुद्ध असून कुस्तीप्रेमी आणि तज्ज्ञ याकडे स्पर्धेतील भारतीय झुंज यादृष्टीने पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या लढतीमध्ये केवळ जय-पराजय महत्त्वाचे नाही, तर आमच्या वजन गटात कोण श्रेष्ठ आहे, हे या लढतीतून कळणार आहे.
विशेष म्हणजे या लढतीसाठी केवळ कुस्ती शिकणारे विद्यार्थीच येणार नसून तर माझ्या गावातील माझे पाठीराखेही या लढतीसाठी माझी कामगिरी पाहण्यास उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर हरफूलविरुद्ध होणारी लढतही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. तरी, दुखापतींचा सामना करून आता मी माझ्या कारकिर्दीत सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेसाठी मी खूप आशावादी आहे. सामन्याआधी आणि सामना झाल्यानंतर माझे गुरू आणि प्रशिक्षक योगेश्वर दत्त यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. सध्या ही लीग अत्यंत चुरशीची होत असल्याने प्रत्येक लढत अटीतटीची होण्याची खात्री आहे. त्याचवेळी, कुस्तीप्रेमींसाठी ही लीग एक खूप मोठे यश आहे. कारण त्यांना भारतीय भूमीवर कुस्ती विश्वातील दिग्गज मल्लांचा खेळ पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळेच मला पूर्ण खात्री आहे, की आगामी टोकियो २०२० आॅलिम्पिकमध्ये प्रो रेसलिंग तिसºया सत्रातील अव्वल १० मल्ल पोडियम स्थान मिळवतील. यातूनच यापूर्वीचे यशस्वी मल्ल आणि भविष्यातील सुपरस्टार यांच्यातील आपली वर्तमान स्थितीही स्पष्ट होईल.