पुजाराने मोडला बोर्डेंचा विक्रम; करुण नायरची संधी हुकली!
By admin | Published: February 10, 2017 02:26 AM2017-02-10T02:26:46+5:302017-02-10T02:26:46+5:30
चेतेश्वर पुजारा आणि करुण नायर या दोघांसाठी गुरुवार ‘कही खुशी कही गम’ असाच ठरला. दोघांच्या नावे वेगवेगळ्या विक्रमांची नोंद झाली
चेतेश्वर पुजारा आणि करुण नायर या दोघांसाठी गुरुवार ‘कही खुशी कही गम’ असाच ठरला. दोघांच्या नावे वेगवेगळ्या विक्रमांची नोंद झाली. पुजाराचे कसोटी शतक हुकले पण तो खूष आहे. संघात स्थान मिळविण्यासाठी त्रिशतक ठोकण्याशिवाय आणखी काय करायला हवे, असा प्रश्न करुणला पडला असावा.
पुजाराने आज चंदू बोर्डे यांचा पाच दशक जुना एका मोसमात सर्वाधिक धावा ठोकण्याचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. बोर्डे यांनी १९६४-६५मध्ये १६०४ धावा केल्या होत्या. यात कसोटी आणि प्रथम श्रेणीतील धावांचा समावेश होता. पुजारा बांगलादेशविरुद्ध ८३ धावांवर बाद झाला. या मोसमात १६०५ धावांची त्याच्या नावावर नोंद झाली. या मोसमात अद्याप चार कसोटी सामने शिल्लक असल्याने तो २००० धावा करू शकतो. २०१२-१३ या मोसमात पुजाराने १५८५ अशा सर्वाधिक धावा केल्या होत्या. हादेखील एक विक्रम आहे.
मागच्या कसोटीत त्रिशतक ठोकणाऱ्या करुण नायरची आज कसोटी खेळण्याची संधी हुकली. अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीपुढे करुणचे योगदान झाकोळले गेले. करुणपूर्वी तीन खेळाडू त्रिशतक ठोकूनदेखील कसोटी खेळण्यापासून असेच वंचित राहिले होते. अॅन्डी संघाम (इंग्लंड), सर लेन हटन (इंग्लंड) आणि इंझमाम उल हक (पाकिस्तान) अशी या खेळाडूंची नावे आहेत.