पुजारा, कोहली निराशाजनक कालखंडात

By admin | Published: August 12, 2014 01:29 AM2014-08-12T01:29:08+5:302014-08-12T01:29:08+5:30

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले.

Pujara, Kohli in disappointing times | पुजारा, कोहली निराशाजनक कालखंडात

पुजारा, कोहली निराशाजनक कालखंडात

Next

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरने निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ मानल्या जाणारे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा इंग्लंड दौऱ्यात त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत निराशाजनक कालखंडातून वाटचाल करीत आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला सलग दोन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याचे मुख्य कारण कोहली व पुजारा यांचा सुमार फॉर्म असल्याचे मानले जात आहे.
मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. पुजारा व कोहली यांच्या व्यतिरिक्त मुरली विजय, गौतम गंभीर व अजिंक्य रहाणे यांनी या लढतीत दोन्ही डावांमध्ये केवळ ८९ धावा केल्या. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आघाडीच्या फळीची ही सातव्या क्रमांकाची निराशाजनक कामगिरी आहे.
राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीत विश्वासपात्र फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणारा पुजारा यंदा सुरुवातीपासून धावा काढण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्याने गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये अखेरचे शतक झळकाविले होते.
हा दिल्लीकर फलंदाज इंग्लंडमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वेलिंग्टनच्या खेळीनंतर कोहलीची कसोटी सरासरी ४६.५१ अशी होती, आता त्यात घसरण झाली असून, ४०.६४ वर आली आहे. कारकिर्दीतील तिसऱ्यांदा त्याची सरासरी ४० पेक्षा कमीवर घसरण्याची शक्यता आहे.
द्रविड व लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी पुजारा व कोहली यांच्यावर आली. या दोघांनी त्यानंतर ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. द्रविड-लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर पुजाराने २० सामन्यांत ५६.४५ च्या सरासरीने १७५० धावा फटकाविल्या. त्यात ६ शतकी खेळींचा समावेश आहे. कोहलीने या सर्व २० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ४४.६० च्या सरासरीने १३३८ धावा फटकाविल्या. भारताने या २० पैकी १० सामन्यांत विजय मिळविला तर ६ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पुजाराने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या उपस्थितीत भारताने १२ सामन्यांत विजय मिळविला. त्यात पुजाराने ७४.२५ च्या सरासरीने ११८८ धावा फटकाविल्या. त्याच्या निराशाजनक कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडला. पुजाराच्या उपस्थितीत संघाला ६ वेळा पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Pujara, Kohli in disappointing times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.