कसोटी क्रमवारीत पुजारा, विराटची घसरण
By admin | Published: August 1, 2014 10:30 PM2014-08-01T22:30:51+5:302014-08-03T00:53:40+5:30
कसोटी रँकिंग : अजिंक्य रहाणेची ९ स्थानांनी झेप
कसोटी रँकिंग : अजिंक्य रहाणेची ९ स्थानांनी झेप
ग्लास्गो : फलंदाजीत सुमार कामगिरी करणारा युवा भारतीय फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची इंग्लंडविरुद्ध तिसर्या साउथम्पटन कसोटीनंतर शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे.
भारताला इंग्लंडविरुद्ध तिसर्या कसोटीत २६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ असे बरोबरीत आले आहेत. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पुजारा दोन क्रमांकांनी घसरून तो १० व्या स्थानावर, तर विराटची एका स्थानाने घसरण होऊन तो १५ व्या क्रमांकावर आला आहे.
तथापि, मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला त्याच्या कामगिरीचा क्रमवारीत लाभ झाला असून त्याने ९ स्थानांनी झेप घेतली असून तो कारकीर्दीतील सवार्ेत्तम अशा २६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रहाणेने या कसोटीत ५४ आणि नाबाद ५२ धावांची खेळी केली होती.
गोलंदाजी रँकिंगमध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. जडेजाने तीन स्थानांनी प्रगती केली असून तो श्रीलंकेच्या शमिंडा इरंगा याच्याबरोबर संयुक्तरीत्या २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमारलाही दोन स्थानांनी लाभ होऊन तो ३२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटी गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज डेल स्टेन अव्वल स्थानी आहे.
कसोटी फलंदाजांत दक्षिण आफ्रिकेचा ॲबी डिव्हिलियर्स सर्वाधिक ८९९ रेटिंग गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे, तर त्याचा संघ सहकारी हाशिम आमलाचे अव्वल तीन मध्ये पुनरागमन झाले आहे. आमलाने श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत नाबाद १३९ आणि २५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. त्याला या कामगिरीमुळे ३४ रेटिंग गुणांचा लाभ झाला आहे.
इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध विद्यमान कसोटी मालिकेत पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा इयान बेल यालादेखील रँकिंगमध्ये पाच स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने केलेल्या १६७ धावांच्या खेळीमुळे तो टॉप २० फलंदाजांत तो १९ व्या स्थानावर पोहोचला आहे. गॅरी बॅलेन्सने १५६ धावांच्या खेळीच्या बळावर १६ स्थानांनी झेप घेतली असून तो सवार्ेत्तम रँकिंगसह ३१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गत कसोटीत ७० धावांची खेळी करणारा इंग्लंडचा कर्णधार ॲलेस्टर कुकने सात क्रमांकांनी झेप घेतली असून तो २२ व्या स्थानावर पोहोचला आहे.