पुजाराची नाबाद शतकी खेळी
By admin | Published: March 19, 2017 02:24 AM2017-03-19T02:24:42+5:302017-03-19T02:24:42+5:30
चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १३०) शतकी खेळीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३६०
रांची : चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १३०) शतकी खेळीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३६० धावांची मजल मारली. तिसऱ्या दिवसअखेर भारत आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत ९१ धावांनी पिछाडीवर असून चार विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी शतकवीर पुजाराला यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (१८) साथ देत होता. आज आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी योजनाबद्ध मारा केला. चार सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहेत.
भारताने कालच्या १ बाद १२० धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय डावात पुजाराने सूत्रधाराची भूमिका बजावली. पुजाराने ११ वे कसोटी शतक झळकावले तर कर्णधार विराट कोहली ६ धावा काढून बाद झाला.
भारतीय संघाला फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी केवळ २४० धावा फटकावता आल्या. पुजाराने ६ तास ५२ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना ३२८ चेंडूंना सामोरे जात १७ चौकार लगावले. दुसऱ्या टोकाकडून रिद्धिमान साहा याने १८ धावा फटकावल्या. अखेरच्या सत्रात हेजलवुडने करुण नायरला (२३) बाद करीत आॅस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. नायरने पुजारासोबत ४४ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने आर. आश्विनला (३) माघारी परतवले. त्यानंतर साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला.
त्याआधी, पुजारा व मुरली विजय (८२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. यंदाच्या मोसमात मायदेशात खेळल्या गेलेल्या १० कसोटी सामन्यांतील ही त्यांची सहावी शतकी भागीदारी ठरली. विजय उपाहारापूर्वीच्या अखेरच्या षटकात बाद झाला. स्टीव्ह ओकीफेच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत फटका मारण्याचा विजयचा प्रयत्न फसला आणि यष्टिरक्षक वेडने यष्टिचित करण्याची संधी गमावली नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर मैदानात परतलेल्या कोहलीने २३ चेंडूंमध्ये ६ धावा केल्या. कमिन्सने डावाच्या ८१ व्या षटकात दुसऱ्या नव्या चेंडूवर त्याला बाद केले. कोहलीचा झेल दुसऱ्या स्लिपमध्ये तैनात स्टीव्हन स्मिथने टिपला. पुजारा वैयक्तिक २२ धावांवर असताना सुदैवी ठरला. पंच ख्रिस गाफानी यांनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंचे अपील फेटाळले. आॅस्ट्रेलियाकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. पुढच्या चेंडूवर विजयने शॉर्ट लेगवर झेल दिला, पण पंच इयान गुड यांनी त्याला नाबाद ठरविले. कोहली बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने (१४) पुजाराला योग्य साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, पण रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. कमिन्सच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. पुजाराने संयम ढळू न देता आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे शतक झळकावले. या मालिकेत भारतीय फलंदाजाचे हे पहिलेच शतक आहे. पहिल्या सत्रात पुजाराने विजयच्या सहकाऱ्याची भूमिका बजावली तर दुसऱ्या सत्रात त्याने मोर्चा सांभाळला. (वृत्तसंस्था)
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ४५१. भारत पहिला डाव - के.एल. राहुल झे. वेड गो. कमिन्स ६७, मुरली विजय यष्टिचित वेड गो. ओकीफे ८२, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १३०, विराट कोहली झे. स्मिथ गो. कमिन्स ०६, अजिंक्य रहाणे झे. वेड गो. कमिन्स १४, करुण नायर त्रि. गो. हेजलवुड २३, रविचंद्रन आश्विन झे. वेड गो. कमिन्स ०३, वृद्धिमान साहा खेळत आहे १८. अवांतर (१७). एकूण १३० षटकांत ६ बाद ३६०. बाद क्रम : १-९१, २-१९३, ३-२२५, ४-२७६, ५-३२०, ६-३२८. गोलंदाजी : हेजलवुड ३१-९-६६-१, कमिन्स २५-८-५९-४, ओकीफे ४३-११-११७-१, लियोन २९-२-९७-०, मॅक्सवेल २-०-४-०.
विजय-पुजारा यांच्या नावावर नवा विक्रम
मुरली विजय व चेतेश्वर पुजारा जोडीने शानदार फलंदाजी करताना केवळ ३७ कसोटी सामन्यांत २५०० धावा फटकावल्या आहेत. भारतासाठी हा नवा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. या दोन दिग्गज खेळाडूंनी एकूण ४२ कसोटी सामन्यांत २५०० धावा फटकावल्या होत्या. या यादीत तिसरा क्रमांक द्रविड-सेहवाग जोडीचा आहे. या दोन खेळाडूंनी ४२ कसोटी सामन्यांत २५०० धावा केल्या आहेत, पण मुरली विजय व पुजारा यांनी हा विक्रम मोडीत काढत आज नवा विक्रम नोंदवला.