पुण्याची प्लेआॅफमध्ये धडक

By admin | Published: May 15, 2017 01:39 AM2017-05-15T01:39:35+5:302017-05-15T01:39:35+5:30

यंदाच्या आयपीएलमधील आणीबाणीच्या लढतीत भेदक गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब

Punak in Pune playhawk | पुण्याची प्लेआॅफमध्ये धडक

पुण्याची प्लेआॅफमध्ये धडक

Next

विश्वास चरणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यंदाच्या आयपीएलमधील आणीबाणीच्या लढतीत भेदक गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला ९ गडी आणि ४८ चेंडू शिल्लक ठेवून चिरडून टाकत प्लेआॅफच्या फेरीत दुसरे स्थान पटकावले.
गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या मैदानावर रविवारी प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने दिलेले ७४ धावांचे आव्हान पुणे संघाने एक गडी गमावत लीलया पेलले. पुण्याची आता मुंबईशी वानखेडेवर क्वालिफायर लढत होईल, तर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बँगलोरमध्ये एलिमिनेटर लढत रंगेल. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करणाऱ्या जयदेव उनाडकटला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. पंजाबने गेल्या दोन सामन्यांत धडाक्यात विजय मिळवून अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या, परंतु निर्णायक सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी हाराकिरी केली.
पंजाबने दिलेल्या छोट्या टार्गेटचा पाठलागही पुण्याने मोठ्या धुमधडाक्यात केला. अजिंक्य रहाणे व राहुल त्रिपाठी या दोघांनी ५ षटकांत ३६ धावा जोडून जवळपास अर्धा टप्पा पार केला होता. दोघे सलामीवीरच पुण्याला विजय मिळवून देणार, असे वाटत असताना त्रिपाठी अक्षर पटेलला चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्याने २८ धावा केल्या. नंतर आलेल्या स्मिथ व सलामीवीर रहाणे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अजिंक्य ३४ व स्मिथ १५ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पुणे संघाने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले. गुप्टिल आणि साहा यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. पुण्याच्या उनाडकटने पहिल्याच चेंडूवर गुप्टिलला बाद करून पुण्याला यश मिळवून दिले. मनोज तिवारीने कव्हर्समध्ये झेल घेतला. या धक्क्यातून पंजाबला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शॉन मार्शला शार्दुल ठाकुरने दहा धावांवर बाद केले. मार्शचा झेल त्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने घेतला. यानंतर पंजाबला ठराविक अंतराने एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. यामुळे पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले गेले, उनाडकटने राहुलचा व रहाणेने मॅक्सवेलचा झेल घेतला. या वेळी पंजाबची अवस्था ५ बाद ३२ अशी होती. उर्वरित फलंदाजांनी पंजाबची धावसंख्या ७३ वर पोहोचवली.


संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : मार्टिन गुप्टिल झे. तिवारी गो. उनाडकट ०, वृद्धिमान साहा झे. धोनी गो. ख्रिस्टीयन १३, शॉन मार्श झे. स्मिथ गो. ठाकुर १०, इयान मॉर्गन धावचित (उनाडकट) ४, राहुल तवैटिया झे. उनाडकट गो. ठाकुर ४, ग्लेन मॅक्सवेल झे. रहाणे गो. ठाकुर ०, अक्षर पटेल झे. धोनी गो. ख्रिस्टीयन २२, स्वप्निल सिंग झे. धोनी गो. उनाडकट १०, मोहित शर्मा झे. ख्रिस्टीयन गो. झम्पा ६, इशांत शर्मा झे. स्मिथ गो. झम्पा १, संदीप शर्मा नाबाद ०; एकूण : १५.५ षटकांत सर्व बाद ७३; गोलंदाजी : उनाडकट ३-१-१२-२, ठाकुर ४-०-१९-३, स्टोक्स ३-०-१०-०, झम्पा ३.५-०-२२-२, ख्रिस्टीयन २-०-१०-२.
रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे नाबाद ३४, राहुल त्रिपाठी त्रि. गो. पटेल २८, स्टिव्ह स्मिथ नाबाद १५; अवांतर : १, एकूण : १२ षटकांत १ बाद ७८; गोलंदाजी : संदीप शर्मा २-०-१२-०, मोहित शर्मा १-०-६-०, इशांत शर्मा १-०-१२-०, तवैटिया ३-०-१४-०, पटेल २-०-१३-१, स्वप्निल सिंग १-०-६-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-१५-०.


आमच्या संघातील युवा भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मी विजयाचे श्रेय त्यांनाच देईन. बँगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून आमचा आत्मविश्वास वाढला. आमची क्वालिफायर लढत मुंबईसारख्या बलाढ्य संघाशी असली तरी या स्पर्धेत आम्ही त्यांना दोन वेळा हरवले असल्यामुळे हा सामना जिंकून आम्ही फायनलमध्ये पोहोचू.
- अजिंक्य रहाणे

आमच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे आम्ही हरलो. खेळपट्टी मंद असली तरी आम्ही किमान १२०-१३० धावा केल्या असत्या तर सामन्याचे चित्र कदाचित वेगळे दिसले असते.
- वीरेंद्र सेहवाग

अशा होतील प्लेआॅफ लढती
क्वालिफायर-१
१६ मे २०१७ मुंबई इंडियन्स
विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट
रात्री ८ वाजता, स्थळ : वानखेडे स्टेडियम,मुंबई

एलिमिनेटर
१७ मे २०१७ सनरायझर्स हैदराबाद
विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
रात्री ८ वाजता, स्थळ : चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर

Web Title: Punak in Pune playhawk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.