पंच रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी
By Admin | Published: February 13, 2016 01:32 AM2016-02-13T01:32:57+5:302016-02-13T01:32:57+5:30
पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचार आणि फिक्सिंगमध्ये दोषी धरले आहे.
मुंबई : पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचार आणि फिक्सिंगमध्ये दोषी धरले आहे.
आयसीसी एलिट पॅनलचे सदस्य तसेच कसोटी पंच असलेले ५९ वर्षांचे रौफ हे आयपीएलच्या २०१३ च्या सत्रात सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याच्या आणि आयपीएल सामने फिक्स करण्याच्या आरोपात दोषी आढळले. रौफ यांच्या भविष्याचा निर्णय अनेक आठवडे लांबणीवर पडला होता. अखेर बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील समितीने शुक्रवारी त्यांच्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. या समितीत ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे. रौफ यांच्यावर आरोप झाल्यानंतर पाकने त्यांची आयसीसी एलिट पॅनलमधून उचलबांगडी केली होती.
बैठकीनंतर बीसीसीआयने जे प्रसिद्धीपत्रक काढले त्यात, ‘पंच रौफ हे पाच वर्षे कुठल्याही प्रकारचे
पंचाचे काम करणार नाहीत, क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणार नाहीत आणि बोर्ड व त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांशी संधंबित राहू शकणार नाहीत,’ असे म्हटले आहे. रौफ हे समितीपुढे हजर झाले नव्हते पण त्यांनी आपले पहिले उत्तर १५ जानेवारी रोजी आणि नंतर लेखी उत्तर ८ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केले होते.
समितीने तपास समितीचा अहवाल तसेच रौफ यांचे उत्तर विचारात घेतल्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या कलम २.२.२, २.३.२, २.३.३ आणि २.४.१ अंतर्गत दोषी धरले. याशिवाय त्यांना गुप्त माहिती इतरांना पुरविल्याच्या आरोपात दोषी धरण्यात आले आहे. रौफ यांच्यावर बंदी घालताच २०१३ पासून सुरू असलेली बोर्डाची कारवाई संपली आहे. (वृत्तसंस्था)