पुणे पुन्हा हरले...
By admin | Published: April 30, 2016 05:41 AM2016-04-30T05:41:25+5:302016-04-30T05:41:25+5:30
गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ३ गडी राखून विजय मिळविला.
विशाल शिर्के,
पुणे- अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर ३ गडी राखून विजय मिळविला. अखेरच्या क्षणी एका चेंडूत १ धाव हवी असताना जेम्स फॉकनरने चेंडू टोलवून एक धाव घेतली व संघाला विजय मिळवून देत स्वत:लाच वाढदिवसाची अनोखी भेट दिली. या सामन्यात लक्षात राहिली ती पुणे संघाच्या स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी व गुजरात लायन्सच्या ड्वेन स्मिथची दमदार अर्धशतकी खेळी.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. गुजरात लायन्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने विजयासाठी दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ व ब्रँडन मॅक्युलम या सलामीच्या जोडीने संघाच्या विजयाचा पाया रचला.
मॅक्युलमने अवघ्या २२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ४३ धावांची खेळी केली. रजत भाटियाने अॅल्बी मॉर्कलकरवी मॅक्युलमला झेलबाद करून ही जोडी फोडली. ड्वेन स्मिथने ३७ चेंडूंत ९ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ६३ धावांची खेळी केली. स्मिथला थिसारा परेराने त्रिफळाबाद करून गुजरातला दुसरा झटका दिला. त्या वेळी गुजरातच्या ६५ चेंडूंत ११५ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३३ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. कार्तिकने ४ चौकारांच्या साह्याने २० चेंडूंत ३३ धावा फटकावल्या. अशोक डिंडाचा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात कार्तिक रहाणेकडे झेल देऊन परतला.
त्यानंतर डिंडाच्याच १९व्या षटकांत ड्वेन ब्राव्हो (७) धोनीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठच्या चेंडूवर रवींद्र जडेजाला (०) धोनीने धावबाद केल्याने गुजरातची अवस्था ५ बाद १८० झाली. थिसारा परेराच्या अखेरच्या षटकात ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. फॉकनरने चौकार मारून अंतर कमी केले. त्यानंतर रैनाला (२८ चेंडूंत ३४) परेराने त्रिफळाबाद करून चुरस निर्माण केली. पाठोपाठच्या चेंडूवर ईशान किशन धावबाद झाला. अखेर २ चेंडूंत ३ धावा हव्या होत्या. त्यावर फॉकनरने २ धावा घेतल्याने एका चेंडूत १ धाव, अशी स्थिती झाली. अखेरच्या चेंडूवर फॉकनरने धाव घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, शिवल कौशिकच्या दहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडाला; मात्र नो बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले. या ४१ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवून स्मिथने ५४ चेंडूंत १०१ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अजिंक्य रहाणे (४५ चेंडूंत ५३), महेंद्रसिंह धोनी (१८ चेंडूंत नाबाद ३०) यांच्या खेळीने पुणे संघाने २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या.
>धावफलक : रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ३ बाद १९५, अजिंक्य रहाणे धावबाद (ब्राव्हो) ५३, सौरभ तिवारी १ धावबाद (सुरेश रैना), स्टीव्हन स्मिथ १०१ त्रि. गो. ब्राव्हो, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३०, थिसारा परेरा नाबाद ३, ड्वेन ब्राव्हो १-४०, प्रवीणकुमार ०-३७, रवींद्र जडेजा ०-३७ पराभूत वि. गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १९६, ड्वेन स्मिथ त्रि. गो. परेरा ६३, ब्रँडन मॅक्युलम ४३ झे. मॉर्कल गो. भाटिया, सुरेश रैना ३४ त्रि. गो. परेरा, दिनेश कार्तिक ३३ झे. रहाणे गो. डिंडा, जेम्स फॉकनर नाबाद ९, अवांतर ७, गोलंदाजी : अशोक डिंडा २-४०, थिसारा परेरा २-४१,
रजत भाटिया १-२६.