डेव्हिस चषक सामन्यासाठी पुणे सज्ज
By admin | Published: January 24, 2017 12:29 AM2017-01-24T00:29:12+5:302017-01-24T00:29:12+5:30
जागतिक टेनिसचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डेव्हिस चषक’ स्पर्धेचा थरार ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात रंगणार आहे.
मुंबई : जागतिक टेनिसचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डेव्हिस चषक’ स्पर्धेचा थरार ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे तब्बल ४३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यात ही स्पर्धा रंगणार असल्याने टेनिसप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.
आशिया - ओशियाना गट १ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे यजमानपद भूषविण्यास पुणेकर सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) यजमानपदाखाली होत असल्याने या सामन्यासाठी पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल अत्याधुनिक सोयी - सुविधांसह सज्ज असल्याचे एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
पुण्यामध्ये याआधी ३१ मार्च ते २ एप्रिल १९६३ दरम्यान ईस्टर्न झोनल गटातील भारत - पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामना रंगला होता. या सामन्यात यजमान भारताने ४-१ अशी बाजी मारली होती, तर डेव्हिस चषक सामन्याचे यजमानपद भूषविण्याची संधी एमएसएलटीएला १० वर्षांनी मिळाली आहे. याआधी २००६ मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आशिया - ओशियाना गटाची भारत - पाकिस्तान लढत रंगली होती.
दरम्यान, या प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी एमएसएलटीएने मुख्य पेट्रन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकिंगक्षेत्रातील उच्च अधिकारी अमृता फडणवीस यांची निवड केली. तसेच, सामन्याच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसचा विशेष गौरवदेखील होणार आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)