पुण्याची सरशी, सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी मात
By admin | Published: April 27, 2016 05:26 AM2016-04-27T05:26:04+5:302016-04-27T05:26:04+5:30
पुणे सुपर जायंटस् संघाने पावसाच्या व्यत्ययात मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा डकवर्थ- लुईस नियमानुसार ३४ धावांनी पराभव केला.
हैदराबाद : पुणे सुपर जायंटस् संघाने पावसाच्या व्यत्ययात मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा डकवर्थ- लुईस नियमानुसार ३४ धावांनी पराभव केला. पुण्याचा चार पराभवांनंतर हा पहिला आणि एकूण दुसरा विजय होता. सहा सामन्यांत पुण्याचे चार गुण झाले. सनरायझर्सने सलग तीन सामने जिंकल्यानंतर पहिल्यांदा पराभवाचे तोंड पाहिले. त्यांचे सहा सामन्यांत सहा गुण आहेत.
हैदराबादच्या २० षटकांतील ८ बाद ११८ धावांचा पाठलाग करणाऱ्या पुणे संघाने पावसाने हजेरी लावेपर्यंत ११ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ९४ पर्यंत मजल गाठली होती. पुण्याचा डाव सुरू असताना पावसामुळे खेळ दुसऱ्यांदा खोळंबला. विजयासाठी ५४ चेंडूत आणखी २५ धावांची गरज होती. स्टीव्हन स्मिथ ३६ चेंडूत सात चौकारांसह ४६ धावा काढून नाबाद होता. फाफ डुप्लेसिसने २१ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह झटपट ३० धावांचे योगदान दिले. रात्री १२.१५ च्या सुमारास पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केल्यानंतर उभय कर्णधारांशी बोलून सामना संपविण्याचा निर्णय घेतला. धोनी पाच धावांवर बाद झाला तर रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. त्याआधी, अशोक डिंडाच्या भेदक माऱ्यामुळे शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीनंतरही सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात ११८ पर्यंतच मजल गाठली.
नाणेफेक गमविल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा अर्धा संघ केवळ ३२ धावात बाद झाला होता. धवनने ५३ चेंडूत नाबाद ५६ धावा ठोकल्या. त्याने नमन ओझासोबत (१८) सहाव्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी करीत १०० धावा फळ्यावर लावल्या. भुवनेश्वर कुमारने आठ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. पावसामुळे खेळ एक तास खोळंबला तरीही षटकांची संख्या घटविण्यात आली नाही. सनरायझर्सच्या गोलंदाजांनी बेजबाबदार फटके मारून विकेट गमावल्या. डिंडाने २३ धावांत तीन, मिशेल मार्शने १४ धावांत दोन आणि रविचंद्रन अश्विनने १४ धावा देत एक गडी बाद केला. पहिल्या पाच सामन्यात चार अर्धशतके ठोकणारा कर्णधार डेव्हिड वॉर्नर पहिल्याच षटकात बाद झाला. वॉर्नरप्रमाणे इयोन मोर्गनही भोपळा न फोडताच बाद झाला. यष्टिमागे धोनीने दीपक हुड्डा आणि मोझेस हेन्रीक्स यांचे सुंदर झेल टिपले.(वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक :
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद ११८ (डेव्हिड वॉर्नर ०, शिखर धवन नाबाद ५६, आदित्य तारे ८, इयान मॉर्गन ०, दिपक हुडा १, मोझेस हेन्रिक्स १, नमन ओझा १८, विपूल शर्मा ५, भुवनेश्वर कुमार २१, आशिष नेहरा ०; अवांतर : ८; गोलंदाजी : अशोक डिंडा ३/२३, मिशेल मार्श २/१४, थिसारा परेरा १/३२, आर. आश्विन १/१४).
रायझिंग पुणे सुपरजायंट्स : अजिंक्य रहाणे ०, फाफ डू प्लेसीस ३०, स्टीव्ह स्मिथ नाबाद ४६, महेंद्रसिंह धोनी ५; अवांतर : १३; गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १/१७, आशिष नेहरा १/२१, मोझेस हेन्रिक्स १/१६.