पुणे संघाला स्टोक्सची उणीव भासेल

By admin | Published: May 16, 2017 01:28 AM2017-05-16T01:28:22+5:302017-05-16T01:28:22+5:30

आयपीएलच्या दहाव्या पर्वात अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ कुठला राहील, याचा निर्णय महाराष्ट्रातील दोन संघांदरम्यान मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीनंतर होईल

The Pune team lacks stacks | पुणे संघाला स्टोक्सची उणीव भासेल

पुणे संघाला स्टोक्सची उणीव भासेल

Next

- सुनील गावसकर लिहितात...
आयपीएलच्या दहाव्या पर्वात अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ कुठला राहील, याचा निर्णय महाराष्ट्रातील दोन संघांदरम्यान मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीनंतर होईल. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर पुणे संघाने शानदार खेळ करीत दुसऱ्या स्थानावर हक्क प्रस्थापित केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान सहजतेने मोडून काढणाऱ्या पुणे संघाने मुंबई संघाला दखल घेण्यास भाग पाडले आहे.
पंजाबविरुद्धच्या लढतीत पुणे संघाने गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली. त्यामुळे फलंदाजांना लक्ष्य गाठताना विशेष कष्ट पडले नाही.
साखळी फेरीमध्ये यापूर्वी महाराष्ट्रातील दोन संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या दोन्ही लढतींमध्ये पुणे संघाने बाजी मारली होती. त्यामुळे या वेळीही विजय मिळवण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरू, असा विश्वास पुणे संघाला नक्की असेल. दरम्यान, या वेळी पुणे संघाला मात्र अष्टपैलू बेन स्टोक्सविना खेळावे लागणार आहे. स्टोक्सची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे पुणे संघाला महत्त्वाच्या लढतींमध्ये त्याची नक्की उणीव भासणार आहे. गेल्या मोसमात तळाच्या स्थानावर असलेल्या पुणे संघामध्ये या वेळी स्टोक्सच्या समावेशामुळे नवा उत्साह संचारला. स्टोक्सचा उत्साह, त्याचे समर्पण आणि त्याचे तंत्र यामुळे पुणे संघ गेल्यावेळच्या तुलनेत अगदी वेगळा भासला. केवळ एका खेळाडूमुळे संघात किती फरक पडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्टोक्स आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, पण काही खेळाडूंच्याबाबतीत मात्र त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ अशी लढत होत असल्याचे चित्र असते. त्या खेळाडूंच्या हाती बॅट किंवा बॉल असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला सुटकेचा श्वास घेता येत नाही. कपिलदेव, इयान बोथम, जावेद मियाँदाद, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली या खेळाडूंची नावे डोक्यात येतात आणि त्यात आता बेन स्टोक्स या नावाची भर पडली आहे. पुणे संघाचे मालक स्टोक्सला बोनस राशीसारखे प्रलोभन देत सामने खेळण्यासाठी प्रवृत्त करू शकले असते तर वेगळी बाब होती, पण क्लब किंवा फ्रँचायझी संघांच्या तुलनेत राष्ट्रीय संघाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
मुंबई इंडियन्सने राखीव खेळाडूंवर विश्वास दाखविताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत संघात सहा बदल केले, पण तरी मुंबई संघाने सहज विजय मिळवला. अंबाती रायुडूने पुनरागमनाच्या लढतीत केलेली चमकदार कामगिरी संघासाठी सुखावणारी आहे. रायुडू सुरुवातीला दुखापतग्रस्त झाला होता. रायुडू अनुभवी असून त्याने चमकदार खेळी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली.
मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तरी अंतिम फेरी गाठण्याची पुन्हा संधी आहे, याची उभय संघांना कल्पना आहे आणि हीच या लढतीची विशेषता आहे. या लढतीतील पराभूत संघाला कोलकाता-हैदराबाद या संघांदरम्यानच्या लढतीतील विजेत्या संघासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उभय संघ कुठलेही दडपण न बाळगता खेळतील आणि त्यामुळे चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल. (पीएमजी)

Web Title: The Pune team lacks stacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.