पुणे संघ यंदा नव्या आव्हानांसाठी सज्ज
By admin | Published: April 4, 2017 12:14 AM2017-04-04T00:14:36+5:302017-04-04T00:14:36+5:30
पुणे संघाची भूतकाळातील कामगिरी समाधानकारक नसली तरी त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत
पुणे : पुणे संघाची भूतकाळातील कामगिरी समाधानकारक नसली तरी त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. संघ नव्या आव्हानांसाठी सज्ज आहे. या मोसमात आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू, असा आशावाद आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सोमवारी पुण्यात व्यक्त केला.
सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील लढतीने बुधवारी (दि. ५) आयपीएलच्या दहाव्या सत्राचा प्रारंभ होत आहे. त्यानंतर पुण्याची पहिली लढत गुरूवारी (दि. ६) घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरूद्ध होत आहे. यासाठी संघाचा सराव जोरात सुरू आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना अजिंक्य म्हणाला, ‘‘खरे तर, मागील वर्षी आमच्या संघाने चांगला खेळ केला. पण, आम्ही थोडक्यात पराभूत झालो. एक-दोन षटकांतील खेळाने सामन्याचे निकाल फिरले. पण, खेळात हे चालायचेच. आता या सर्व गोष्टी मागे पडल्या आहेत. मोसमाचा प्रारंभ चांगला होणे महत्वाचे आहे. त्यावर आमचा भर असेल.’’
नुकत्याच झालेल्या भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीला दुखापत झाल्याने अखेरच्या सामन्यात अजिंक्यने नेतृत्व केले. त्याने नेतृत्वगुण आणि कामगिरीच्या जोरावर भारताला ही निर्णायक लढत जिंकून दिली. यामुळे भारताने २-१ अशा फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. यासंदर्भातील घडामोडींवर तो भरभररून बोलला. ‘‘दुखापतीमुळे निर्णायक सामन्यात विराट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काही काळ दु:खाचे वातावरण होते. मात्र, लगेच सर्वांनी स्वत:ला सावरत सर्वस्व झोकून खेळण्याचा निर्धार केला. नेतृत्वाचा विचार करता विराट आणि माझी शैली वेगळी आहे. यामुळे अचानक नेतृत्वाची जबाबदारी आल्यावर संघसहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवणे, त्यांची लय बिघडू न देणे यावर मी भर दिला. आमचे सर्वांचे लक्ष्य सामना जिंकण्याचे होते. यामुळे एक टीम म्हणून सहजपणे आव्हानांना सामोरे गेलो. पहिल्या दिवशी आॅस्ट्रेलियाच्या चांगल्या प्रारंभानंतर आपल्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा करीत कमबॅक केले. मला विचाराल तर, तो या निर्णायक कसोटीचा टर्निंग पॉर्इंट होता. अर्धा सामना आम्ही पहिल्याच दिवशी जिंकला होता,’’ असे अजिंक्यने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
>विराट आणि सचिनने मनोबल वाढविले...
विराट हा आक्रमक कर्णधार आहे. दुसरीकडे, अजिंक्य हा संयम ढळू न देता शांतपणे कृती करणारा. ‘‘ऐनवेळी कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतर मी काहीसा विचारात असताना खुद्द विराटने तुझ्या पद्धतीने ‘लीड’ कर, असा सल्ला दिला. सचिननेही फोन करून हेच सांगितले. यामुळे आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली,’’ असे अजिंक्यने नमूद केले.
>खेळाडू आणि माणूस म्हणून धोनी जबरदस्त
भारतीय संघाचा माजी कर्णघार आणि कॅ प्टन कूल हे बिरूद आपल्या वर्तनाने सार्थ ठरवणाऱ्या धोनीची अजिंक्यने मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘‘धोनीसारखा खेळाडू संघात असणे इतर खेळाडूस्ाांठी भाग्याची गोष्ट असते. खेळाडू म्हणून त्याची विचार करण्याची पद्धत शिकण्यासारखी आहे. धोनीचा नुसता वावरदेखील खेळाडूंचे मनोबल वाढविणारा ठरतो. माणूस म्हणनूही तो तितकाच ‘कूल’ आहे.’’
>टी-२० वाटतो तितका सोपा प्रकार नाही...
२० षटके लवकर संपत
असल्याने टी-२० हा प्रकार सोपा आहे, असे नव्हे. या प्रकारात
झटपट निर्णय घ्यावे लागतात. खेळपट्टीवर आल्यावर
फलंदाजांना लवकरात लवकर परिस्थिती आणि आव्हानांशी जुळवून घ्यावे लागते. यामुळे हा प्रकार वाटतो तितका सोपा नक्कीच नाही, असे मत यावेळी अजिंक्यने मांडले.