पुणे कसोटी: गोलंदाजांचा टिच्चून मारा, कांगारूंच्या शेपटाची वळवळ
By admin | Published: February 23, 2017 04:54 PM2017-02-23T16:54:44+5:302017-02-23T16:54:44+5:30
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ आले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 गडी बाद 256 धावा केल्या आहेत. शेवटच्या गड्यासाठी मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड यांनी 51 धावांची भागीदारी रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली.
ऑस्ट्रेलियाकडून सलामिवीर एम. रेनशॉ आणि तळाचा खेळाडू मिचेल स्टार्क व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मिचेल मार्श अर्धशतक फटकावून 57 धावांवर खेळत आहे. तर रेनशॉने 68 धावांची खेळी केली. अश्विनने त्याला मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताकडून उमेश यादवने भेदक मारा करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. जयंत यादवनेही एक विकेट मिळवली.
त्यापुर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने घेतला होता. सलामीविर डेव्हिड वॉर्नर आणि एम. रेनशॉ यांनी संघाला सावध सुरूवात करून दिली. मात्र, लंचपूर्वी 28 व्या षटकात उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरला (38) त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं. पुढच्याच चेंडूवर दुसरा सलामिवीर रेनशॉ(36) हा रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर मात्र कांगारूंचे ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले. चार विकेट पडल्यावर रेनशॉ पुन्हा खेळायला आला मात्र चांगली भागीदारी रचण्यात कांगारूंना अपयश आलं.
गेल्या तब्बल 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेल्या भारतीय संघाचं या सामन्यात पारडं जड मानलं जात आहे. ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. 2015 पासून भारताने सलग 6 मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी भारत प्रयत्नशील असणार आहे.