पुणेकर मुंबईकर आज भिडणार

By admin | Published: April 6, 2017 04:14 AM2017-04-06T04:14:43+5:302017-04-06T04:14:43+5:30

अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाला आयपीएलच्या गेल्या मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले

Puneer will fight today with Mumbaikar | पुणेकर मुंबईकर आज भिडणार

पुणेकर मुंबईकर आज भिडणार

Next

जयंत कुलकर्णी,
पुणे- अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाला आयपीएलच्या गेल्या मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, यंदा नवा कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळताना पुणेकरांनी सकारात्मक सुरुवातीचा निर्धार केला आहे. मात्र, त्याचवेळी त्यांचा सलामीला सामना होणार आहे तो बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुध्द. त्यामुळे या ‘महाराष्ट्र डर्बी’चा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता लागली आहे.
पुणे संघाच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास महेंद्रसिंग धोनीच्या जागी स्मिथ हा नवा कर्णधार त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता स्मिथच्या नेतृत्वात पुणेकर कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पुणे संघ कागदावर तरी समतोल दिसत आहे. खुद्द कर्णधार स्मिथसह, धोनी, फाफ डू प्लेसिस आणि अजिंक्य रहाणे हे प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. विशेष म्हणजे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर धोनी आपल्या नैसर्गिक खेळावर अधिक भर देताना दिसेल. त्यामुळे, त्याचा धोका प्रतिस्पर्धी संघाला असेल. त्याचबरोबर यंदाच्या सत्रात सर्वाधिक किंमत लाभलेला स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची कामगिरी निर्णायक ठरेल. रविचंद्रन आश्विनच्या अनुपस्थितीमुळे पुणेकरांची गोलंदाजी कमजोर असली तरी, स्टार फिरकीपटू इम्रान ताहीर त्याची कमतरता भरुन काढेल. शिवाय, अशोद दिंडा, डॅनियल ख्रिस्टियन आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल.
मुंबई इंडियन्स पिछाडीवर मात करण्यात तरबेज आहेत. कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झुकविण्याची क्षमता राखून असलेले अष्टपैलू खेळाडू मुंबईकडे असल्याने पुण्याला सावध रहावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा असतील. मांडीवर झालेल्या शस्त्रक्रीयेनंतर ५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत आहे. तसेच, पार्थिव पटेल, लेंडल सिमन्स, अंबाती रायडू, जोस बटलर, केरॉन पोलार्ड, कृणाल आणि हार्दिक हे पंड्या बंधू लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर मुंबईची मदार आहे.
गतवर्षी पुणेकरांनी शानदार सुरुवात करताना मुंबईकरांना त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवले होते. मात्र, गेल्यावर्षी पुणे संघ खेळाडूंच्या दुखापतींनी बेजार झाल्याने त्यांना आठ संघांच्या लीगमध्ये अखेर सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे, अपयशी सुरुवातीनंतर मुंबईकरांनी जबरदस्त लय पकडली होती. परंतु, दुर्दैवाने तेव्हा उशीर झाला होता आणि त्यांना गुणतालिकेत पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. त्यामुळेच दोन्ही संघ यंदा विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असल्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्याची मेजवानी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

Web Title: Puneer will fight today with Mumbaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.