पुणेकरांनी बुल्सला सहज लोळवले
By admin | Published: February 28, 2016 01:00 AM2016-02-28T01:00:54+5:302016-02-28T01:00:54+5:30
कर्णधार मनजीत चिल्लरचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि अजय ठाकूरच्या खोलवर चढाया या जोरावर पुणेरी पलटनने बंगळुरू बुल्सला ४४-२७ अशी धडक दिली. या शानदार विजयासह
- रोहित नाईक, नवी दिल्ली
कर्णधार मनजीत चिल्लरचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि अजय ठाकूरच्या खोलवर चढाया या जोरावर पुणेरी पलटनने बंगळुरू बुल्सला ४४-२७ अशी धडक दिली. या शानदार विजयासह पुणेकरांनी प्रो कबड्डीमध्ये यंदाच्या सत्रात गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे बंगळुरू बुल्सचा हा सलग नववा पराभव ठरला.
त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात आक्रमक सुरुवात केलेल्या पुणेकरांना बंगळुरूने चांगलेच झुंजवले. ९व्याच मिनिटाला त्यांनी पुण्यावर पहिला लोण चढवताना ७-४अशी आघाडी घेतली. मात्र, यानंतर पुणेकरांनी मागे वळून बघितले नाही. नेहमीप्रमाणे सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना मनजीतने बंगळुरूच्या क्षेत्रात जोरादर मुसंडी मारली. अजय ठाकूरनेदेखील त्याला उपयुक्त साथ देताना बंगळुरूचा बचाव खिळखिळा केला. १६व्या मिनिटाला बंगळुरूवर पहिला लोण चढवून मध्यंतराला पुणेरी पलटनने १९-१३ अशी आघाडी मिळवली.
यानंतरही पुणेकरांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवून बंगळुरूवर आणखी २ लोण चढवले. यावेळी अजय ठाकूरने निर्णायक चढाई केल्या. पहिल्या डावात सुपर रेड केल्यानंतर दुसऱ्या डावातही सुपर रेड करताना एकाचवेळी तब्बल ४ गडी मारले आणि संघाला २८-२१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या बाजूने सुरेंद्र सिंग व दीपक हूडाने देखील आक्रमणात मोलाचे योगदान दिले.
पराभूत बंगळुरू बुल्सचा हा एकूण ११ वा पराभव असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात दीपक कुमारने एकाकी लढत देताना ७ गुणांची कमाई केली. आशिष शिगवण व पवन कुमारने अष्टपैलू खेळ करताना प्रत्येकी ४ गुण मिळवले.