पुणेकरांनी पुन्हा नमवले

By admin | Published: April 24, 2017 11:38 PM2017-04-24T23:38:20+5:302017-04-25T01:11:07+5:30

मुंबईला दिलेल्या 161 धावांच्या माफक आव्हानाचा बचाव करताना पुण्याच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात टिच्चून मारा करत करत मुंबईचा 3 धावांनी पराभव केला.

Puneites beat again | पुणेकरांनी पुन्हा नमवले

पुणेकरांनी पुन्हा नमवले

Next

रोहित नाईक /ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतरही फलंदाजांनी ऐनवेळी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सचा विजयी अश्वमेध अखेर रोखला गेला. जयदेव उनाडकटने शेवटच्या षटकात घेतलेले महत्त्वपूर्ण बळी आणि बेन स्टोक्सचा अचूक मारा यांमुळे रायझिंग पुणे सुपरजायंटने ३ धावांनी बाजी मारत यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा मुंबईला नमवले. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा हा केवळ दुसराच पराभव असून दोन्ही पराभव त्यांनी पुण्याविरुद्धच पत्करले. तसेच, यासह मेंटॉर सचिन तेंडुलकरला वाढदिवसानिमित्त विजयाची भेट देण्याचे मुंबईचे स्वप्नही धुळीस मिळाले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात १६१ धावांचा पाठलाग करताना मुंबईकर सुरुवातीपासूनच अडखळताना दिसले. खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जात असलेला कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केल्यानंतरही इतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. पार्थिव पटेल - जोस बटलर या जोडीने नेहमीप्रमाणे आक्रमक सलामी दिली. परंतु, बटलर आक्रमकतेच्या नादात बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. मुंबईला ८ बाद १५७ धावांवर रोखून पुण्याने बाजी मारली. 
बेन स्टोक्सने टिच्चून मारा करत मुंबईकरांना जखडून ठेवले. त्याने एक षटक निर्धाव टाकून २१ धावांत २ बळी घेतले. तसेच, सुरुवातीला धावांची खैरात केलेल्या जयदेव उनाडकटने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये अचूक मारा करुन मोक्याच्या वेळी २ बळी घेत मुंबईकरांचे कंबरडे मोडले. रोहित व्यतिरिक्त पार्थिवने (३३) चांगली फटकेबाजी केली. परंतु, संघाला विजयी करण्यात दोघेही अपयशी ठरले. बटलर, नितीश राणा, केरॉन पोलार्ड व हार्दिक पंड्या अपयशी ठरल्याचा मुंबईला फटका बसला.
तत्पूर्वी, पुण्याने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६० धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे - राहुल त्रिपाठी यांनी मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही दाद न देता दमदार अर्धशतकी सलामी दिली. मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्लेनघन, यंदा पहिलाच सामना खेळत असलेला कर्ण शर्मा, हुकमी जसप्रीत बुमराह व हरभजनसिंग असे सर्वजण धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. परंतु, अखेर कर्ण शर्मानेच मुंबईला यश मिळवून देत धोकादायक रहाणेला (३८) बाद केले. यानंतर राहुल त्रिपाठीने सूत्रे आपल्याकडे घेत ३१ चेंडूंत ४५ धावा काढल्या. मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१७), गतसामन्यात निर्णायक फटकेबाजी करणारा महेंद्रसिंह धोनी (७), अष्टपैलू बेन स्टोक्स (१७) अपयशी ठरल्याने पुण्याची धावसंख्या मर्यादित राहिली. हरभजनने स्मिथचा त्रिफळा उडवून आयपीएल कारकिर्दीतील आपला २०० वा बळी मिळवला. 
अखेरच्या काही चेंडंूत मनोज तिवारीने (२२) केलेल्या फटकेबाजीमुळे पुण्याला समाधानकारक मजल मारता आली. कर्ण शर्मा व बुमराह यांनी प्रत्येकी दोन, तर जॉन्सन व हरभजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 
संक्षिप्त धावफलक :
रायझिंग पुणे सुपरजायंट : २० षटकांत ६ बाद १६० धावा (राहुल त्रिपाठी ४५, अजिंक्य रहाणे ३८; जसप्रीत बुमराह २/२९, कर्ण शर्मा २/३९) वि. वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १५७ धावा (रोहित शर्मा ५८, पार्थिव पटेल ३३; बेन स्टोक्स २/२१, जयदेव उनाडकट २/४०.)

Web Title: Puneites beat again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.